रमेश आडसकरांच्या पोस्टमधून भाजप चिन्ह, नेते गायब!
रोखठोक न्युज वार्ताहर
भाजपचे नेते रमेश आडसकर यांनी शुक्रवारी फेसबुकवर विजयाच्या ठाम विश्वासाने २०२४ ची विधानसभा निवडणूक लढवणारच असल्याची पोस्ट केली आहे; परंतु या पोस्टवर भाजप पक्षाचा व कोणत्याही नेत्याचा फोटो नसल्याने याची वेगळी चर्चा सुरू झाली आहे.
भाजपचे रमेश आडसकर यांनी २०१९ ला माजलगावातून विधानसभा निवडणूक प्रकाश सोळंके यांच्या विरोधात लढवली होती. यात आडसकर यांचा अल्पमताने पराभव झाला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून मतदारसंघात काम सुरू केले होते. तेव्हापासून ते आजपर्यंत माजलगाव मतदारसंघातच रात्रंदिवस कार्यरत आहेत. रमेश आडसकर यांनी गेल्या काही दिवसांपासून मतदार संघातील बहुतांश गावांचा दौरा केला. त्यानंतर जनता ही परिवर्तनासाठी सज्ज असून ताकदीने माझ्या पाठीशी आहे. मी ही निवडणूक लढवणारच, अशी फेसबुक पोस्ट रमेश आडसकर यांनी स्वतःच्या अकाउंटवरून शेअर केली. मात्र, या पोस्टवर पक्षाचे चिन्ह किंवा पक्षाचे नेत्याचा फोटो दिसला नसल्याने रमेश आडसकर हे येत्या विधानसभा निवडणूक कोणत्याही पक्षातून किंवा चिन्हावर लढणार, या चर्चेला उधाण आले आहे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटाची शक्यता
माजलगाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले होते; परंतु सोळंके हे अजित पवार यांच्यासोबत राहिल्याने येथील जागा महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसला सुटण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपच्या अनेक इच्छुक उमेदवारांचा हिरमोड होऊ लागला आहे. त्यामुळे गतवेळी अल्पमताने पराभूत झालेले भाजपचे रमेश आडसकर आगामी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढण्याच्या तयारीत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार व धनंजय मुंडे यांच्यासोबत त्यांच्या अनेक वेळा बैठका झाल्याचे बोलले जात आहे. या चर्चेमुळे भाजपचे तालुकाध्यक्ष व अनेक कार्यकर्ते आडसकर यांच्यापासून दूर झाल्याचे पाहावयास मिळत आहे.