चॉकलेट चोरीच्या संशयावरून ८ वर्षीय मुलास झाडाला दीड तास बांधून ठेवले
केज तालुक्यातील घटना, महिला किराणा दुकानदारासह तिघांवर अॅट्रॉसिटी
रोखठोक न्युज वार्ताहर
शाळा सुटल्यानंतर घराकडे निघालेल्या तिसरीच्या आठवर्षीय विद्यार्थ्यास किराणा दुकानदाराने चॉकलेट चोरल्याच्या संशयातून कपड्याने झाडाला दीड तास बांधून ठेवले. येवता (ता. केज) येथे ही घटना घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला.
केज तालुक्यातील येवता येथे जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकणारा बाळू संतोष गायकवाड हा बालक २९ ऑगस्ट रोजी मधल्या सुटीत घरी येत होता. या बालकास गावातील एक किराणा दुकानदार कविता जोगदंड
या महिलेने चॉकलेट चोरल्याच्या संशयावरून घरासमोर असलेल्या प्राजक्ताच्या झाडाच्या खोडाला बांधले. त्यामुळे बालक घाबरून रडू लागले. या वेळी बालकाने पाण्याची मागणीही केली, मात्र महिलेने त्याला पाणी दिले नाही. दरम्यान, दुपारच्या सुटीत मुलगा घरी न आल्याने त्याच्या आईने मुलाचा शोध घेतला. त्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. या घटनेमुळे मुलगा घाबरल्याने त्याच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मुलास बांधून का ठेवले, अशी विचारणा केली असता बालकाच्या आईला कविता जोगदंड, त्यांचे पती पांडुरंग जोगदंड, मुलगा गोपाळ जोगदंड या तिघांनी शिवीगाळ केली. याप्रकरणी संतोष गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध अॅट्रॉसिटीसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल झाला.