मन्मथ स्वामींच्या दिंडीत भरधाव ट्रक घुसला!
महिला भाविक जखमी; मस्साजोग येथे संतप्त भाविकांचा रास्ता रोको
रोखठोक न्यूज वार्ताहर
केज (बीड) : संतशिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या पालखी दिंडीमध्ये भरधाव ट्रक घुसल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात महिला भाविक जखमी झाल्याने दिंडीतील भाविक संतप्त झाले असून, केज तालुक्यातील मस्साजोग येथे रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतशिरोमणी मन्मथ स्वामींची पालखी दिंडी मार्गक्रमण करत असताना अचानक भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने दिंडीतील भाविकांना धडक दिली. या धडकेत काही महिला भाविक जखमी झाल्या. जखमी महिलांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दिंडीमध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी असताना भरधाव ट्रकने धडक दिल्याने भाविकांमध्ये एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर संतप्त भाविकांनी मस्साजोग येथे रस्त्यावर ठिय्या मांडत वाहतूक रोखून धरली.
दिंड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
पालखी दिंड्या आणि धार्मिक मिरवणुका मार्गक्रमण करत असताना भाविकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची, असा संतप्त सवाल या घटनेनंतर उपस्थित होत आहे. दिंडीला योग्य पोलीस संरक्षण देण्यात यावे, महामार्गावर सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात आणि अपघातास जबाबदार ट्रक चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्या भाविकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, रास्ता रोको आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून भाविकांच्या मागण्यांवर योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
