• Thu. Nov 26th, 2026

रमाई नगरच्या गायरान जमिनीवर भूमाफियांचा डोळा! वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या दलित कुटुंबांना हुसकावण्याचा प्रयत्न? बेकायदेशीर खरेदी-विक्री थांबवण्याची मागणी आठ दिवसांत कारवाई करा, अन्यथा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा-योगेशभाई गायकवाड

Bybaba maske

Nov 25, 2026

रमाई नगरच्या गायरान जमिनीवर भूमाफियांचा डोळा!

वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या दलित कुटुंबांना हुसकावण्याचा प्रयत्न? बेकायदेशीर खरेदी-विक्री थांबवण्याची मागणी

आठ दिवसांत कारवाई करा, अन्यथा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा-योगेशभाई गायकवाड

केज | रोखठोक न्यूज

केज शहरातील रमाई नगर येथील दलित वस्तीत असलेल्या शासकीय गायरान जमिनीवर भूमाफियांनी कब्जा करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. गट क्रमांक ३०/१ व ३०/२ या शासकीय जमिनीची कथित बेकायदेशीर खरेदी-विक्री होत असल्याचा आरोप करत ही खरेदी-विक्री तात्काळ थांबवावी, अशी मागणी योगेशभाई गायकवाड यांनी तहसीलदार, केज यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

वर्षानुवर्षे या जमिनीवर वास्तव्यास असलेल्या दलित अतिक्रमणधारकांच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. २०११ पासून या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना कथित भूमाफियांकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याने त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

गायरान जमीन कोणाच्या घशात घालण्याचा प्रयत्न?

रमाई नगरमधील गट क्रमांक ३०/१ व ३०/२ ही जमीन गायरान व शासकीय स्वरूपाची असल्याचा दावा करण्यात आला आहे. या जमिनीची बेकायदेशीर खरेदी-विक्री होत असेल, तर त्यामागे नेमके कोणाचे पाठबळ आहे? शासकीय जमिनीच्या व्यवहारांना संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची मदत मिळाली आहे का? असे संतप्त सवाल उपस्थित होत आहेत.

शासकीय जमिनींचे संरक्षण करण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना, त्याच जमिनीवर वर्षानुवर्षे राहणाऱ्या गरीब दलित कुटुंबांना धमकावले जात असल्याचा आरोप गंभीर आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून बेकायदेशीर व्यवहारात सहभागी असलेल्या व्यक्तींसह दोषी अधिकारी आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दलित कुटुंबांना संरक्षण द्या!

रमाई नगर येथे भगवान गौतम बुद्धांची मूर्ती असल्याने या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने खबरदारी घ्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

संबंधित अतिक्रमणधारकांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, जमिनीची भूमी अभिलेख विभागामार्फत अधिकृत मोजणी करण्यात यावी आणि जमिनीच्या व्यवहारांची संपूर्ण चौकशी करून अहवाल तयार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

ही जमीन शासनाच्या ताब्यात घेण्यात यावी किंवा नियमानुसार पात्र अतिक्रमणधारकांच्या नावावर नोंद करण्याबाबत कार्यवाही करावी. तसेच जमिनीच्या मोजणीचे प्रमाणपत्र आंदोलनकर्त्याला देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

आठ दिवसांचा अल्टिमेटम; अन्यथा आंदोलन!

योगेशभाई गायकवाड यांनी प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या कालावधीत योग्य ती कारवाई न झाल्यास तहसील कार्यालयासमोर रमाई नगरमधील अतिक्रमणधारकांसह आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदनाच्या प्रती महसूल मंत्री, जिल्हाधिकारी बीड, केज पोलीस निरीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना पाठवण्यात आल्या आहेत.

आता प्रशासनाने केवळ निवेदन स्वीकारून फाईल धूळखात ठेवायची की शासकीय जमिनीवरील कथित भूमाफियांचा डाव उधळून लावायचा, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. रमाई नगरमधील गरीब दलित कुटुंबांना न्याय मिळणार की भूमाफियांच्या दबावापुढे त्यांचे अस्तित्वच धोक्यात येणार, याकडे केज शहराचे लक्ष लागले आहे.

रोखठोक न्यूज, जनसामान्यांच्या अन्यायाविरुद्ध आवाज

baba maske

Related Post

बीड–अंबाजोगाई महामार्गावरील लॉजमध्ये कथित वेश्याव्यवसायाचा सुळसुळाट! लॉज चालकांना कोणाचे अभय? चोवीस तास डोळ्यात तेल घालून काम करणाऱ्या पोलिसांना हे दिसत नाही का?
केज शहराला लॉजचा विळखा! परवान्यांचा हिशेब कुठे? अवैध धंद्यांच्या संशयाने नागरिक संतप्त! अल्पवयीन मुला-मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न; लॉजची दिवसा-रात्री अचानक झडती घेण्याची मागणी
केजकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर! दुष्काळात केजकरांच्या पाण्यासाठी लोकप्रतिनिधींची बेफिकिरी! ना आमदारांची बैठक, ना नगराध्यक्षांचा पुढाकार; पाण्यासाठी नागरिकांची वणवण दुष्काळ जाहीर होऊन महिना उलटला, ना आमदारांची बैठक, ना नगराध्यक्षांचा पुढाकार; केजकरांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!