बीड–अंबाजोगाई महामार्गावरील लॉजमध्ये कथित वेश्याव्यवसायाचा सुळसुळाट!
लॉज चालकांना कोणाचे अभय? चोवीस तास डोळ्यात तेल घालून काम करणाऱ्या पोलिसांना हे दिसत नाही का?
रोखठोक न्यूज | बीड
बीड–अंबाजोगाई राज्य रस्त्यालगत सुरू असलेल्या लॉजची तात्काळ तपासणी करण्याची मागणी होत आहे. या लॉजमध्ये कथित वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे आरोप होत असून, हा प्रकार कोणाच्या आशीर्वादाने चालतो, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
लॉजच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांमुळे परिसरातील सामाजिक वातावरण दूषित होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः अल्पवयीन मुला-मुलींना अशा जाळ्यात ओढले जात असल्याच्या तक्रारी गंभीर असून, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पोलिसांच्या नजरेतून हे प्रकार सुटतात कसे?
चोवीस तास सेवा देणारे पोलीस प्रशासन महामार्गावरील या लॉजकडे दुर्लक्ष करते का? नियमित गस्त, तपासणी आणि गुप्त माहिती यंत्रणा असताना कथित गैरप्रकारांवर नियंत्रण का येत नाही? की काही लॉज चालकांना कुणाचे तरी अभय मिळत आहे?
सर्व लॉजची झाडाझडती घ्या!
बीड–अंबाजोगाई राज्य रस्त्यालगतच्या सर्व लॉजची अचानक तपासणी करावी, नोंदवही व सीसीटीव्ही तपासावे, अल्पवयीन मुला-मुलींच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे आणि गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
लॉजच्या आडून कोणते धंदे सुरू आहेत, याचा पर्दाफाश होणार का? की कथित गैरप्रकारांना पुन्हा मोकळे रान मिळणार?
रोखठोक न्यूज, जनसामान्यांच्या अन्यायाविरुद्ध आवाज
