अंबाजोगाईत गुंडगिरीचा कळस!
- बारावीच्या विद्यार्थ्यावर मध्यरात्री प्राणघातक हल्ला; डोक्यात दांडक्याचे घाव, प्रकृती चिंताजनक
रोखठोक न्यूज | अंबाजोगाई प्रतिनिधी
अंबाजोगाई शहरातील ट्युशन एरियामध्ये गुंडगिरीने कळस गाठल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अभ्यासिका संपवून रूमवर परतणाऱ्या बारावीच्या १७ वर्षीय विद्यार्थ्यावर तिघा गुंडांनी भररस्त्यात लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आशिष विनोद माने याच्यावर लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
बुधवारी (दि. १७) मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास आशिष माने हा अभ्यास करून पायी रूमवर जात असताना दुचाकीवरून आलेल्या साहिल मांदळे, जीतू मांदळे आणि एका अल्पवयीन आरोपीने त्याला अडवून शिवीगाळ केली. त्यानंतर एका आरोपीने लाकडी दांडक्याने आशिषच्या डोक्यावर जोरदार वार केला. या अचानक झालेल्या हल्ल्यात आशिष रक्तबंबाळ होऊन रस्त्यावर कोसळला.
हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाल्यानंतर जखमी अवस्थेतील आशिषने मदतीसाठी आलेल्या व्यक्तीला मोबाईलचा पासवर्ड सांगितला आणि बेशुद्ध झाला. संबंधित व्यक्तीने तत्काळ कुटुंबीयांना संपर्क साधून आशिषला रुग्णालयात दाखल केले. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
रातोरात पोलिसांची कारवाई; तिन्ही आरोपी ताब्यात
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने शोधमोहीम राबवत तिन्ही आरोपींना काही तासांतच ताब्यात घेतले. यामध्ये साहिल मांदळे, जीतू मांदळे आणि एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. दोन्ही प्रौढ आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात बीएनएस कलम १०९, ३५२ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वशिष्ठ कागणे करत आहेत.
ट्युशन एरिया की गुंडांचा अड्डा?
अंबाजोगाईतील ट्युशन एरियामध्ये गेल्या काही महिन्यांपासून गुंड प्रवृत्तीच्या तरुणांचा वावर वाढल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. विद्यार्थिनींची छेडछाड, मारामाऱ्या, दहशत आणि बेफाम वाहनचालना यामुळे विद्यार्थी व पालक त्रस्त झाले आहेत. पोलिसांची नियमित गस्त नसल्यामुळे या भागात गुंडगिरीला खतपाणी मिळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
“उद्या एखाद्या विद्यार्थ्याचा जीव गेला तर जबाबदार कोण?”
या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ट्युशन एरियात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही नियंत्रण आणि गुंडांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
