• Fri. Jun 19th, 2026

“आणखी किती बळी घेतल्यावर जागे होणार शासन?”माजलगाव-तेलगाव मृत्यूमार्ग ठरला; रस्त्यावरील भेगेने घेतला आणखी एका महिलेचा जीवनिष्काळजी प्रशासन आणि ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Bybaba maske

Jun 19, 2026

“आणखी किती बळी घेतल्यावर जागे होणार शासन?”

माजलगाव-तेलगाव मृत्यूमार्ग ठरला; रस्त्यावरील भेगेने घेतला आणखी एका महिलेचा जीव

निष्काळजी प्रशासन आणि ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

रोखठोक न्यूज | माजलगाव प्रतिनिधी

माजलगाव-तेलगाव सिमेंट रस्ता हा विकासाचा नव्हे तर मृत्यूचा मार्ग बनला असून प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे आणखी एका निष्पाप महिलेचा बळी गेला आहे. रस्त्यावरील धोकादायक भेगांमध्ये दुचाकीचे टायर अडकल्याने झालेल्या भीषण अपघातात मनीषा नामदेव थेटे (वय ४१, रा. राजेवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून “शासन आणखी किती बळी घेणार?” असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

बुधवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास मनीषा थेटे या आपल्या पतींसोबत पुतण्याच्या लग्नाचा बस्ता बांधून मोटरसायकलवरून राजेवाडीकडे परतत होत्या. लहामेवाडीजवळ पोहोचताच रस्त्यावरील खोल आणि जीवघेण्या भेगेत दुचाकीचे पुढील चाक अडकले. क्षणार्धात दुचाकीवरील ताबा सुटला आणि दोघेही रस्त्यावर फेकले गेले.

या अपघातात मनीषा थेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. मदतीसाठी नागरिक धावून आले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. एका कुटुंबाचा आधारस्तंभ असलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याने राजेवाडीसह परिसरात शोककळा पसरली आहे.

रस्ता की सापळा? ४० हून अधिक बळींचा दावा

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, माजलगाव-तेलगाव मार्गावरील भेगा, खचलेले भाग आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे यापूर्वीही अनेक अपघात घडले आहेत. या रस्त्याने आतापर्यंत ४० हून अधिक नागरिकांचे जीव घेतल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत. मात्र प्रत्येक अपघातानंतर केवळ आश्वासने दिली जातात आणि काही दिवसांत सर्व काही विसरले जाते.

“हा अपघात नाही, प्रशासनाचा बळी”

नागरिकांनी या घटनेला अपघात नसून प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झालेला मृत्यू ठरवले आहे. रस्त्याची दुरवस्था अनेकदा निदर्शनास आणूनही संबंधित विभाग, लोकप्रतिनिधी आणि ठेकेदार यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.

ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करून त्याच्यावर तसेच दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

प्रश्न थेट शासनाला…

  • आणखी किती निरपराध नागरिकांचा जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार?
  • मृत्यूचे कारण ठरलेल्या भेगा अद्याप का बुजवल्या गेल्या नाहीत?
  • निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई का होत नाही?
  • नागरिकांच्या जीवाची किंमत नेमकी किती?

माजलगाव-तेलगाव रस्ता आज नागरिकांसाठी प्रवासाचा मार्ग नसून भीतीचा विषय बनला आहे. तातडीने भेगा बुजवून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा या मृत्यूंचे पाप शासन आणि संबंधित यंत्रणांच्या माथी राहील, अशी तीव्र भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

“रस्त्यावरील भेगा नाहीत… त्या प्रशासनाच्या निष्काळजीपणाच्या जखमा आहेत; ज्यातून दरवेळी एखाद्या निष्पापाचा जीव वाहून जात आहे!” 

— रोखठोक न्यूज 

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!