• Tue. Aug 25th, 2026

कचरा जाळून टिपर भस्मसात; केज नगरपंचायतीच्या निष्काळजीपणाचा फटका नागरिकाला, भरपाईची मागणी

Bybaba maske

Jun 20, 2026

कचरा जाळून टिपर भस्मसात; केज नगरपंचायतीच्या निष्काळजीपणाचा फटका नागरिकाला, भरपाईची मागणी

रोखठोक न्यूज वार्ताहर | केज

केज नगरपंचायतीच्या सफाई विभागाच्या हलगर्जीपणामुळे एका नागरिकाच्या खासगी टिप्पर गाडीला आग लागून ती पूर्णपणे जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील कचरा नियोजित कचरा डेपोत नेऊन विल्हेवाट लावण्याऐवजी तो जिथे साचला होता, त्याच ठिकाणी पेटवून दिल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप संबंधित वाहन मालकाने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केज-धारूर रोडवरील एका प्लॉटमध्ये अनेक दिवसांपासून कचऱ्याचा ढीग साचलेला होता. नगरपंचायतीने वेळेवर कचरा उचलण्याऐवजी सफाई कर्मचाऱ्यांकडून त्याच ठिकाणी कचरा जाळण्यात आला. वाऱ्यामुळे आग भडकली आणि जवळ उभी असलेली एमएच-४४-५१२५ क्रमांकाची खासगी टिप्पर गाडी आगीच्या विळख्यात सापडली. काही क्षणांतच गाडी जळून खाक झाली.

या प्रकरणी वाहन मालक हनुमंत ज्ञानोबा इंगळे यांनी नगरपंचायतीकडे लेखी अर्ज सादर करून नुकसानभरपाईची मागणी केली आहे. अर्जात त्यांनी स्पष्ट नमूद केले आहे की, नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी कचरा जाळल्यामुळेच ही आग लागली आणि त्यात त्यांची गाडी जळाली.

प्रश्नांची सरबत्ती

  • शहरातील कचरा उचलून डेपोत नेण्याऐवजी रस्त्यालगतच का जाळला गेला?
  • कचरा जाळण्याची परवानगी कोणी दिली?
  • आगीच्या ठिकाणी अग्निसुरक्षा उपाययोजना का नव्हत्या?
  • नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्यास जबाबदार कोण?

नगरपंचायत नागरिकांकडून कर वसूल करते, मात्र कचरा व्यवस्थापनातील निष्काळजीपणामुळे नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

“कचरा जाळला नगरपंचायतीने… जळाली मात्र नागरिकाची गाडी!”
या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई व नुकसानग्रस्ताला तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!