• Tue. Aug 25th, 2026

शॉर्टसर्किटच्या आगीत पत्रकार प्रशांत मस्के यांचे संसाराचे स्वप्न राख; घरासह कपड्यांचे दुकान भस्मसात आगीत संसारोपयोगी साहित्य, व्यवसायाचे भांडवल जळून खाक; पत्रकार कुटुंबावर संकटाचा डोंगर

Bybaba maske

Jun 20, 2026

शॉर्टसर्किटच्या आगीत पत्रकार प्रशांत मस्के यांचे संसाराचे स्वप्न राख; घरासह कपड्यांचे दुकान भस्मसात

आगीत संसारोपयोगी साहित्य, व्यवसायाचे भांडवल जळून खाक; पत्रकार कुटुंबावर संकटाचा डोंगर

रोखठोक न्यूज | अंबाजोगाई प्रतिनिधी

पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील दुःख-दैन्याला वाचा फोडणाऱ्या पत्रकारालाच नियतीने मोठा आघात दिला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील धावडी येथे आज सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण आगीत पत्रकार प्रशांत रघुनाथ मस्के यांचे घर आणि कपड्यांचे दुकान पूर्णपणे जळून खाक झाले. क्षणात लागलेल्या या आगीने मस्के कुटुंबाचा संसार आणि व्यवसाय दोन्ही उद्ध्वस्त झाले.

प्राथमिक माहितीनुसार, विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आग इतकी भीषण होती की घरातील फर्निचर, टीव्ही, कुलर, वॉशिंग मशीन यांसह अनेक संसारोपयोगी वस्तू आगीत भस्मसात झाल्या. त्याचबरोबर दुकानातील साड्या, कपडे आणि विक्रीसाठी ठेवलेला संपूर्ण माल जळून खाक झाला. या दुर्घटनेत सुमारे 1 लाख 61 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

स्वतःच्या कष्टाने उभा केलेला संसार आणि व्यवसाय काही मिनिटांत राख झाल्याने मस्के कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. अनेक वर्षांच्या मेहनतीने उभारलेले घर आणि व्यवसाय आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील, सरपंच, तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून प्रशासनाकडे अहवाल सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

समाजातील प्रश्न मांडणाऱ्या आणि लोकांच्या अडचणींना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने लेखणी चालवणाऱ्या पत्रकारावरच आज संकटाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे शासनाने आणि लोकप्रतिनिधींनी या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांसह पत्रकार बांधवांकडून होत आहे.

आगीने फक्त घर आणि दुकान जाळले नाही, तर एका कष्टकरी पत्रकाराचे अनेक वर्षांचे स्वप्नही राख करून टाकले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!