• Sun. Jun 21st, 2026

भांडण सोडवायला गेला, पण मृत्यूच्या दाढेत ढकलला गेला!टाकळीतील तरुणावर चाकू हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू, आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा रस्ता रोको

Bybaba maske

Jun 21, 2026

भांडण सोडवायला गेला, पण मृत्यूच्या दाढेत ढकलला गेला!

टाकळीतील तरुणावर चाकू हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू, आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा रस्ता रोको

रोखठोक न्यूज | केज प्रतिनिधी

केज तालुक्यातील टाकळी येथे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका निष्पाप तरुणाला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भांडण मिटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या 27 वर्षीय तरुणावरच धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपींच्या तात्काळ अटकेच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको आंदोलन केले.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार (दि. 20 जून) रोजी रात्री केज रस्त्यावरील एका हॉटेलसमोर काही व्यक्तींमध्ये जोरदार वाद आणि हाणामारी सुरू होती. ही घटना पाहून टाकळी येथील विलास नवनाथ घुले (वय 27) हा तरुण भांडण सोडवण्यासाठी पुढे सरसावला. मात्र, वाद मिटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विलास यालाच काही जणांनी लक्ष्य करत बेदम मारहाण केली आणि धारदार शस्त्राने पोटासह शरीरावर वार केले.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विलास घुले यांना तातडीने आंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर शर्थीचे प्रयत्न केले, मात्र गंभीर जखमांमुळे रविवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती गावात पोहोचताच टाकळीसह परिसरातील नागरिक संतप्त झाले. आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको आंदोलन करत निषेध व्यक्त केला. तसेच आरोपींना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका कुटुंबीय आणि नातेवाईकांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत केज पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून संशयितांचा शोध सुरू आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

या हृदयद्रावक घटनेमुळे टाकळी गावासह संपूर्ण केज तालुक्यात शोककळा पसरली असून, “भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाचा बळी” या घटनेने कायदा-सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!