केज पोलिसांची मोठी कारवाई! घरफोडीतील आरोपी अवघ्या ४८ तासांत जेरबंद; ३.५५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
स्थानिक गुन्हे शाखा व केज पोलिसांची संयुक्त कारवाई; रोख रक्कम व चांदीचे दागिने जप्त
रोखठोक न्यूज| प्रतिनिधी
केज पोलिसांनी घरफोडी प्रकरणाचा अवघ्या ४८ तासांत छडा लावत आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून एकूण ३ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या जलद कारवाईमुळे पोलिसांच्या तपास कौशल्याचे कौतुक होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन केज येथे गु.र.नं. ४५९/२०२६ कलम ३३१(४), ३०५(अ) भारतीय न्याय संहिता अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांच्याकडे सुरू होता.
तपासादरम्यान पोउपनि महेश विघ्ने यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ऋषिकेश उर्फ रवींद्र दिलीप काळे (रा. फुलेनगर, ता. केज, जि. बीड) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपीने घरफोडीची कबुली दिली.
आरोपीकडून २ लाख ८१ हजार रुपयांची रोख रक्कम तसेच ७४ हजार रुपयांचे चांदीचे दागिने असा एकूण ३ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी आरोपीला केज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके व सहायक पोलीस अधीक्षक व्यंकटरमण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोउपनि महेश विघ्ने, पोहेकॉ बबनसाहेब चौंडे, दिलीप गिते, महेश गोंडगे, जफर पठाण व वाहनचालक गणेश मराठे यांनी केली.घरफोडीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आणत आरोपीला अटक केल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखा व केज पोलिसांच्या कामगिरीचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.
