लाडक्या बहिणींना मोठा धक्का! राज्यभरातून तब्बल ९२ लाख नावे वगळली; बीड जिल्ह्यात सर्वाधिक अपात्र लाभार्थी
बीड जिल्हा यात ही पुढेच
रोखठोक न्यूज वार्ताहर
राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठी छाननी करण्यात आली असून, राज्यभरातील तब्बल ९२ लाख महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या छानणीत बीड जिल्ह्यात सर्वाधिक सुमारे २.८३ लाख महिलांची नावे अपात्र ठरल्याने वगळण्यात आल्याचे वृत्त आहे.
शासनाने ई-केवायसी, उत्पन्नाची अट, शासकीय नोकरी, चारचाकी वाहन, आयकरदाते, तसेच इतर पात्रता निकषांच्या आधारे लाभार्थ्यांची पडताळणी केली. या प्रक्रियेत अपात्र, दुबार किंवा नियमबाह्य लाभ घेणाऱ्या महिलांची नावे यादीतून कमी करण्यात आली.
या छानणीनंतर योजनेतील लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून, शासनाकडून आता केवळ पात्र महिलांनाच लाभ देण्यावर भर दिला जात आहे. ज्यांचे नाव यादीतून वगळले गेले आहे, त्यांनी संबंधित विभागाकडे संपर्क साधून किंवा अधिकृत पोर्टलवर आपली पात्रता तपासून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यात सर्वाधिक नावे वगळल्याने या जिल्ह्यातील अर्जांची छाननी आणि पात्रतेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
