बेपत्ता ग्रामसेवकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला!
गेवराई, दि. ११ : गेवराई तालुक्यातील रेवकी-देवकी आणि बागपिंपळगाव ग्रामपंचायतीचा पदभार सांभाळणारे ग्रामसेवक तुकाराम भागवत घोलप हे गेल्या पाच-सहा दिवसांपासून बेपत्ता होते. अखेर बीड शहरालगतच्या सह्याद्री देवराई परिसरात त्यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी (दि. ११) दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास सह्याद्री देवराई परिसरात नागरिकांना मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक माहितीनुसार, मृतदेहाची ओळख तुकाराम घोलप यांची असल्याचे सांगण्यात येत आहे.
घोलप हे काही दिवसांपासून बेपत्ता असल्याने त्यांच्या कुटुंबीयांसह संबंधितांकडून त्यांचा शोध सुरू होता. मात्र, त्यांचा मृतदेह आढळल्याने शोधमोहीमेला दुर्दैवी वळण मिळाले.
मृत्यूमागचे गूढ काय?
तुकाराम घोलप यांनी नेमके कोणत्या कारणातून टोकाचे पाऊल उचलले का, किंवा त्यांच्या मृत्यूमागे अन्य काही कारण आहे का, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे घोलप यांच्या मृत्यूमागील नेमके गूढ काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून, या प्रकरणाचा अधिक तपास बीड ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येत आहे. तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
घोलप यांच्या आकस्मिक मृत्यूने कुटुंबीय, ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत विभागात शोककळा पसरली आहे.
— रोखठोक न्यूज
जनसामान्यांच्या अन्यायाविरुद्ध आवाज
