केज पोलिसांची मोठी कारवाई! १४.८८ लाखांचा ७४.४३२ किलो गांजा जप्त; आरोपी जेरबंद
केवड गायरान परिसरात छापा; सुनील शिवाजी पवार याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा
केज | प्रतिनिधी
केज तालुक्यात अवैध गांजा विक्री व लागवडीविरोधात केज पोलिसांनी मोठी कारवाई करत १४ लाख ८८ हजार ६४० रुपये किमतीचा तब्बल ७४.४३२ किलो गांजा सदृश झाडांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत सुनील शिवाजी पवार, रा. केवड गायरान, ता. केज, जि. बीड याला पोलिसांनी जेरबंद केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ सप्टेंबर २०२६ रोजी पोलीस निरीक्षक राहुल सूर्यवंशी यांना गोपनीय माहिती मिळाली होती. केवड गायरान येथील संशयिताच्या राहत्या घराच्या समोरच्या शेतामध्ये गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाड टाकली.
छाप्यादरम्यान शेतातील मोकळ्या जागेत गांजाच्या झाडांची लागवड केल्याचे आढळून आले. पोलिसांनी झाडे जप्त करून त्यांचे वजन केले असता ७४.४३२ किलो वजनाचा मुद्देमाल, ज्याची किंमत ₹१४,८८,६४० असल्याचे समोर आले.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक इनामदार यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुनील शिवाजी पवार याच्याविरुद्ध कलम ८(ब), २० एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि लक्ष्मण उंबरे हे करीत आहेत.
कारवाईत पोलिसांसह महसूल विभागाचीही भूमिका
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकट राम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक राहुल सूर्यवंशी, सपोनि लक्ष्मण उंबरे, पोउपनि जावेद कराडकर, पोउनि इनामदार, पोहेकॉ/१६७३ बाळासाहेब अहंकारे, पोहेकॉ/१६७७ महावीर सोनवणे, पोशि. १८६७ नितीन वारे, पोशि. २१९२ दादाराव देवगुडे, पोशि. ४३६ राहुल तरकसे, पोशि. २७४ गोरेख फड, पोशि. ४७१ संतोष गिते, पोशि. ७४ शिवाजी कागदे यांचा सहभाग होता.
तसेच सक्षम अधिकारी नायब तहसीलदार केज श्री. फुलचंद श्रीरंग हांगे, शासकीय पंच युवराज छत्रभुज कसबे आणि किशोर संजय राजळ यांनीही कारवाईत सहभाग घेतला.
