• Sun. Nov 1st, 2026

स्वतःच्या घरापासून सुरुवात! रस्ता रुंदीकरणासाठी नगराध्यक्ष काकाजी (नंदकिशोर मुंदडांनी) पाडली घराची संरक्षक भिंतनियम सांगण्यापेक्षा ते स्वतः पाळून दाखवले; अतिक्रमण हटाव मोहिमेतून शहराला दिला कृतीचा संदेश

Bybaba maske

Nov 1, 2026

स्वतःच्या घरापासून सुरुवात! रस्ता रुंदीकरणासाठी नगराध्यक्ष काकाजी (नंदकिशोर मुंदडांनी) पाडल घराची संरक्षक भिंत

नियम सांगण्यापेक्षा ते स्वतः पाळून दाखवले; अतिक्रमण हटाव मोहिमेतून शहराला दिला कृतीचा संदेश

रोखठोक न्यूज | अंबाजोगाई

शहराच्या विकासासाठी अतिक्रमण हटवण्याची वेळ येते, तेव्हा अनेकदा विरोधाचे सूर उमटतात. स्वतःच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला की नियम बाजूला ठेवण्याची मानसिकताही दिसून येते. मात्र, अंबाजोगाईत सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या मोहिमेत नगराध्यक्ष नंदकिशोर (काकाजी) मुंदडा यांनी स्वतःच्या घराची संरक्षक भिंत पाडून घेतल्याने चर्चेला वेगळे वळण मिळाले आहे.

शहरातील रस्ते मोकळे व्हावेत, वाहतुकीला अडथळे निर्माण होऊ नयेत आणि अतिक्रमण हटाव मोहिमेला गती मिळावी, यासाठी नगराध्यक्षांनी स्वतःच्या घरापासून सुरुवात केली. रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारी आपल्या घराची संरक्षक भिंत त्यांनी स्वतःहून हटवून घेतली. लोकप्रतिनिधींनी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करताना स्वतःही त्याच नियमांच्या चौकटीत राहावे, हा संदेश या कृतीतून समोर आला आहे.

महावितरणच्या कार्यालयातील तो प्रसंग आजही आठवतो!

काकाजी मुंदडा यांच्या या भूमिकेमागील त्यांच्या नियमपालनाच्या स्वभावाचा प्रत्यय यापूर्वीही आला होता. एकदा बातमीच्या निमित्ताने केज येथील महावितरण कार्यालयात गेलो असताना, एका तालुकास्तरीय नेत्याने तेथील अधिकाऱ्यांसमोरून नगराध्यक्ष मुंदडा यांना फोन केला होता. घराचे वीज कनेक्शन थकीत बिलामुळे तोडण्यात आल्याची तक्रार करत ते पुन्हा जोडून देण्याची विनंती केली.

मात्र, काकाजींनी संबंधित व्यक्तीला थेट थकीत वीजबिल किती आहे, असा प्रश्न विचारला. रकमेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी किमान निम्मे बिल भरण्याचा सल्ला दिला. पैसे नसतील तर मी मदत करतो, असेही सांगितले. त्याचवेळी स्वतःच्या घराचे वीजबिल वेळेवर भरत असल्यामुळेच महावितरणच्या अधिकाऱ्यांशी अधिकारवाणीने बोलण्याचा नैतिक अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

त्या दिवशीचा हा संवाद आणि आज स्वतःच्या घराची भिंत हटवण्याची कृती यांची सांगड घातली, तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. सार्वजनिक जीवनात नियमांचा आग्रह धरण्यापूर्वी स्वतः त्या नियमांचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

अंबाजोगाई शहरात सध्या अतिक्रमण हटाव आणि रस्ता रुंदीकरणाची मोहीम सुरू आहे. या मोहिमेला नागरिकांचे सहकार्य मिळणे आवश्यक आहे. मात्र, त्यासाठी प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींनीही स्वतः उदाहरण घालून देणे तितकेच महत्त्वाचे आहे.

शहराच्या विकासासाठी स्वतःच्या मालमत्तेचा अडथळा दूर करण्याची तयारी दाखवणे, ही केवळ भिंत पाडण्याची घटना नाही; तर सार्वजनिक हिताला प्राधान्य देण्याचा संदेश आहे. शहराचा रस्ता रुंद करण्यासाठी आधी स्वतःच्या घरासमोरील अडथळा दूर करणाऱ्या या कृतीची अंबाजोगाईत चर्चा होत आहे.

baba maske

Related Post

आंतरजिल्हा चोरट्यांच्या टोळीचा बीड पोलिसांकडून पर्दाफाश; ९ लाखांचा मुद्देमाल जप्त, चार आरोपी अटकेत! नेकनूर, केज, दिंद्रुड परिसरातील घरफोडी व वाहनचोरीचे चार गुन्हे उघडकीस
केज नगरपंचायतीचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर! मुख्य बाजारपेठेत सांडपाण्याचे साम्राज्य; व्यापारी, नागरिक त्रस्त नवरात्रापूर्वी पाडलेला चौक अद्याप दुरुस्तीच्या प्रतीक्षेत; खड्डे, दुर्गंधी आणि अपघातांनी नागरिक हैराण, बाजारपेठ बंद ठेवून आंदोलनाचा इशारा!
केज पोलिसांची सतर्कता! हरवलेले ११ मोबाईल शोधून मूळ मालकांना परत; नागरिकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!