केज पोलिसांची सतर्कता! हरवलेले ११ मोबाईल शोधून मूळ मालकांना परत; नागरिकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य
रोखठोक न्यूज वार्ताहर | केज
नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधून ते पुन्हा मूळ मालकांच्या स्वाधीन करण्याची कौतुकास्पद कामगिरी केज पोलिसांनी केली आहे. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि CEIR प्रणालीचा प्रभावी वापर करून तब्बल ११ मोबाईल फोन शोधून काढले. अंदाजे २ लाख ५० हजार रुपये किमतीचे हे मोबाईल शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी मूळ मालकांना परत करण्यात आले. हरवलेला मोबाईल पुन्हा हातात मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले.
केज पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांचे मोबाईल हरवल्याबाबत तसेच गहाळ झाल्याच्या प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने पोलिसांनी संबंधित मोबाईलचे IMEI क्रमांक CEIR (Central Equipment Identity Register) या प्रणालीवर नोंदवून मोबाईल ट्रेसिंगला टाकले होते. त्यानंतर तांत्रिक पद्धतीने तपास करून पोलिसांनी एकूण ११ मोबाईलचा शोध घेतला.
या मोबाईलचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या हस्ते ११ मोबाईल मूळ मालकांना परत देण्यात आले.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कावत (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई चेतना तिडके, तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी केज वेंकटराम (भापोसे) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या मोहिमेत पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ, सपोनि लक्ष्मण उंबरे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक इनामदार, पोलीस हेड कॉन्स्टेबल अहंकारे (पो.अं. १६७३), पोलीस अंमलदार तरकसे (पो.अं. ४३६), शिवाजी कागदे (पो.अं. ७४), वारे (पो.अं. १८६७) आणि संतोष गिते (पो.अं. ४७१) यांनी सहभाग घेतला.
मोबाईल हरवल्यास तात्काळ तक्रार करा!
केज पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मोबाईल हरवल्यास विलंब न करता केज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. तक्रारीच्या आधारे तांत्रिक तपास करून हरवलेला मोबाईल शोधण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जातील.
रोखठोक न्यूज, जनसामान्यांच्या अन्यायाविरुद्ध आवाज!
