दिवाळीच्या तोंडावर अतिक्रमणधारकांवर प्रशासनाचा हातोडा! दुष्काळात छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ?
अंबाजोगाईत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शासकीय रुग्णालयापर्यंत दोन्ही बाजूंनी ५०-५० फुटांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम; वर्षभरात दुसऱ्यांदा कारवाई, नागरिकांत संताप!
रोखठोक न्यूज | अंबाजोगाई
एकीकडे दुष्काळी परिस्थिती, दुसरीकडे दिवाळीचा सण तोंडावर आलेला असताना अंबाजोगाई शहरात अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेने छोट्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शासकीय रुग्णालय या प्रमुख मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी तब्बल ५०-५० फुटांपर्यंत अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. ऐन सणासुदीच्या काळात प्रशासनाच्या या कारवाईमुळे हातावर पोट असलेल्या छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, याच वर्षात दुसऱ्यांदा अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. मग यापूर्वी केलेल्या कारवाईचे पुढे काय झाले? अतिक्रमण पुन्हा कसे वाढले? आणि वारंवार कारवाई करूनही कायमस्वरूपी नियोजन का केले जात नाही? असे सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत.
शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी, रस्ते मोकळे व्हावेत, याला कोणाचाही विरोध नाही. मात्र, दुष्काळामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या छोट्या व्यावसायिकांना दिवाळीच्या तोंडावरच उद्ध्वस्त करण्याची घाई प्रशासनाला का? मोठ्या व्यावसायिकांपासून ते हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यांपर्यंत सर्वांसाठी समान निकष आहेत का? कारवाईपूर्वी पर्यायी जागा, पूर्वसूचना आणि पुनर्वसनाचा विचार झाला आहे का? असे अनेक प्रश्न या मोहिमेमुळे निर्माण झाले आहेत.
दिवाळी हा छोट्या व्यावसायिकांसाठी वर्षातील महत्त्वाचा व्यवसायाचा काळ असतो. याच काळात दुकानांसमोरील जागा आणि व्यवसायाची साधने हटवली जात असल्याने अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात अतिक्रमण हटवायचेच असेल तर त्यासाठी नियोजनबद्ध आणि सर्वांना समान न्याय देणारी भूमिका प्रशासनाने घ्यायला हवी.
प्रशासनाने एक गोष्ट लक्षात घ्यावी, रस्ते मोकळे करणे ही जबाबदारी आहे; मात्र गरीबांच्या चुली विझवून विकास साधता येत नाही!
अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली केवळ हातोडा चालविण्यापेक्षा शहराच्या वाहतुकीचा कायमस्वरूपी प्रश्न सोडविणे आणि छोट्या व्यावसायिकांच्या रोजीरोटीचा विचार करणे अधिक महत्त्वाचे आहे. अन्यथा प्रशासनाच्या या कारवाईविरोधातील नागरिकांचा असंतोष आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रोखठोक न्यूज — जनसामान्यांच्या अन्यायाविरुद्ध आवाज!
