केज नगरपंचायतीचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर! मुख्य बाजारपेठेत सांडपाण्याचे साम्राज्य; व्यापारी, नागरिक त्रस्त
नवरात्रापूर्वी पाडलेला चौक अद्याप दुरुस्तीच्या प्रतीक्षेत; खड्डे, दुर्गंधी आणि अपघातांनी नागरिक हैराण, बाजारपेठ बंद ठेवून आंदोलनाचा इशारा!
रोखठोक न्यूज वार्ताहर | केज
केज नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभाराचा फटका आता थेट शहरातील व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. शहराची मुख्य बाजारपेठ आणि व्यापारी संकुल परिसरात सांडपाण्याचे साम्राज्य निर्माण झाले असून, तुंबलेल्या नाल्या, दुर्गंधीयुक्त पाणी, रस्त्यांवरील खड्डे आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. ऐन सणासुदीच्या आणि खरेदीच्या काळात शहराच्या मुख्य बाजारपेठेची ही अवस्था झाल्याने नगरपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त होत आहे.
मुख्य बाजारपेठेतील रस्त्यालगतच्या नाल्यांची आणि भुयारी गटारांची अनेक महिन्यांपासून नियमित स्वच्छता झाली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. परिणामी नाल्या तुंबून सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत आहे. परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, साचलेल्या घाण पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांचा धोका लक्षात घेता प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे अपेक्षित असताना, प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.
खड्ड्यांत सांडपाणी, दुचाकीस्वारांचा जीव धोक्यात!
मुख्य बाजारपेठेला जोडणाऱ्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांत सांडपाणी साचल्याने रस्त्याला चिखलाचे स्वरूप आले आहे. दुचाकी घसरून किरकोळ अपघात घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वाहनांमुळे पादचाऱ्यांच्या अंगावर घाण पाणी उडत असून, नागरिक आणि वाहनधारकांमध्ये वादाचे प्रसंगही घडत आहेत. बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांनाही या अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे.
नवरात्रापूर्वी चौक पाडला; दुरुस्ती मात्र अद्याप नाही!
शहरातील मुख्य चौकाची अवस्थाही अत्यंत दयनीय झाली आहे. ऐन नवरात्र उत्सवापूर्वी हा चौक पाडण्यात आला; मात्र त्यानंतर आवश्यक दुरुस्ती करण्यात न आल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या चौकात दररोज लहान-मोठे अपघात घडत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. वारंवार लक्ष वेधूनही दुरुस्ती होत नसल्याने हा चौक ‘अपघातप्रवण क्षेत्र’ घोषित करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे नगरपंचायत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त होत आहे.
व्यापारी आक्रमक; बाजारपेठ बंद ठेवून आंदोलनाचा इशारा!
मुख्य बाजारपेठेतील अस्वच्छता, तुंबलेल्या नाल्या, रस्त्यांवरील खड्डे आणि चौकाच्या रखडलेल्या दुरुस्तीबाबत व्यापारी व नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप आहे. नगरपंचायत प्रशासनाच्या या कारभारामुळे व्यापारी, ग्राहक आणि सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. आता प्रशासनाला जागे करण्यासाठी बाजारपेठ बंद ठेवून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त व्यापारी व नागरिकांनी दिला आहे.
नगरपंचायत प्रशासनाला प्रश्न : नागरिकांनी कर भरायचा कशासाठी?
शहरातील स्वच्छता, नाल्यांची नियमित सफाई, रस्त्यांची डागडुजी आणि नागरिकांना सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देणे ही नगरपंचायतीची जबाबदारी नाही काय? सणासुदीच्या काळातही मुख्य बाजारपेठेची अशी दुरवस्था असेल, तर शहराच्या इतर भागांची परिस्थिती काय असेल, असा सवाल उपस्थित होत आहे.
आता तरी नगरपंचायत प्रशासनाने जागे होऊन मुख्य बाजारपेठेतील सांडपाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, नाल्यांची स्वच्छता करावी, खड्डे बुजवावेत आणि मुख्य चौकाची त्वरित दुरुस्ती करावी. अन्यथा व्यापारी आणि नागरिकांच्या संभाव्य आंदोलनाला प्रशासनच जबाबदार राहील, असा इशारा संतप्त नागरिकांकडून दिला जात आहे.
रोखठोक न्यूज – जनसामान्यांच्या अन्यायाविरुद्ध आवाज!
