जीवाचीवाडी साठवण तलावावर पाणीचोरीचा धुमाकूळ!
गरीब शेतकऱ्यांनी कृषिपंप काढले; मात्र बड्या शेतकऱ्यांकडून अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सर्रास पाणी उपसा?
१५ ते २० गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; दोषींवर कारवाई करून कृषिपंप जप्त करण्याची शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे मागणी
केज, दि. १ :
एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असताना दुसरीकडे जीवाचीवाडी (ता. केज) येथील साठवण तलावातून शेतीसाठी बेकायदेशीरपणे पाणी उपसा सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, सर्वसामान्य आणि गरीब शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या आदेशाचा मान राखत आपले कृषिपंप, स्टार्टर आणि विद्युत तारा काढून घरी ठेवल्या आहेत. मात्र, काही प्रभावशाली शेतकरी राजकीय नेते आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या कथित अभयामुळे तलावातील पाण्याची सर्रास उचल करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
जीवाचीवाडी येथील साठवण तलाव हा परिसरातील तब्बल १५ ते २० गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रमुख आधार आहे. या तलावातील पाणीसाठा नागरिकांच्या पिण्याच्या गरजेसाठी उपलब्ध राहणे अत्यंत आवश्यक आहे. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्यातील तलावांमधील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. असे असतानाही जीवाचीवाडी तलावातून शेतीसाठी विद्युत मोटारींच्या माध्यमातून पाणी उपसा सुरू असल्याने प्रशासनाच्या आदेशांना केराची टोपली दाखवली जात असल्याचे चित्र आहे.
गरीब शेतकऱ्यांसाठी कायद्याचा बडगा, प्रभावशालींसाठी अभय?
सामान्य शेतकऱ्यांनी कारवाईच्या भीतीने आपापले कृषिपंप, स्टार्टर आणि वायर काढून ठेवले असताना काही शेतकऱ्यांकडून मात्र कोणतीही भीती न बाळगता पाणी उपसा सुरू असल्याचा आरोप होत आहे. मग प्रशासनाचे नियम सर्वांसाठी समान आहेत की केवळ गरीब शेतकऱ्यांनाच कायद्याचा धाक दाखवला जात आहे, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
तहसीलदारांकडे कारवाईची मागणी
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्यांचे कृषिपंप, स्टार्टर आणि विद्युत तारा तात्काळ जप्त कराव्यात. तसेच या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांचीही चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी तहसीलदार अशोक भंडारे यांच्याकडे केली आहे.
१५ ते २० गावांतील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असताना प्रशासन नेमकी कोणाची बाजू घेणार? पिण्यासाठी राखीव असलेले पाणी वाचवण्यासाठी प्रशासन प्रत्यक्ष मैदानात उतरणार की प्रभावशालींच्या पाणी उपशाकडे डोळेझाक करणार? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
रोखठोक न्यूज, जनसामान्यांच्या अन्यायाविरुद्ध आवाज!
