कला केंद्राच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा छळ!
डांबून ठेवून अनैतिक कृत्यांसाठी दबाव; बनावट आधारकार्ड तयार केल्याचाही आरोप, केजमध्ये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
केज, दि. १६ (प्रतिनिधी) रोखठोक न्यूज
केज तालुक्यातील बरड फाटा परिसरातील रेणुका कला केंद्रातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नोकरीचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीला जिल्ह्याबाहेर नेणे, तिचे वय लपविण्यासाठी बनावट आधारकार्ड तयार करणे आणि त्यानंतर कला केंद्रात नाचकाम करण्यास भाग पाडणे, एवढेच नव्हे तर ग्राहकांसोबत अनैतिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पार्टी मालकीण, कला केंद्राचा मालक आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी येथील बारावीचे शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीची ओळख प्रगती चव्हाण हिच्याशी झाली. तिने लातूर येथे नोकरी आणि कामधंद्याचे आमिष दाखवून मुलीचा विश्वास संपादन केला. यासाठी ३० जुलै २०२६ रोजी मुलीला अडीच हजार रुपये पाठविण्यात आले. लातूर येथे पोहोचल्यानंतर तिला शिवाजीनगर येथील राधिका कला केंद्रात नेण्यात आले. मात्र, वय कमी असल्याने तेथे काम करण्यास मुलीने नकार दिला.
त्यानंतर पार्टी मालकीण अंजली भारत चव्हाण हिच्या धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथील खोलीवर मुलीला पाठविण्यात आले. तेथे एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, मुलीचे वय कमी असल्याने तिचे वय लपविण्यासाठी बनावट आधारकार्ड तयार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर ९ नोव्हेंबर २०२६ रोजी अंजली चव्हाण हिने मुलीला केज तालुक्यातील बरड फाटा परिसरातील रेणुका कला केंद्रात आणले.
या कला केंद्राचे मालक डॉ. रामधन ढाकणे (रा. सारोळा, ता. केज) आणि सुजित शिंगारे (रा. अंबाजोगाई) यांना मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही तिला नाचकाम करण्यास भाग पाडण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच ग्राहकांसोबत अनैतिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकल्याचाही आरोप आहे.
पार्टी मालकीण पोलिसांच्या ताब्यात; दोघांचा शोध सुरू
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या कारवाईत पार्टी मालकीण अंजली भारत चव्हाण हिला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या प्रकरणातील अन्य दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती आहे.
खोलीत डांबून ठेवण्यात आल्यानंतर पीडित मुलीने धाडस दाखवत ११२ या आपत्कालीन क्रमांकावर फोन केला. फोन लोकेशनच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू करून घटनास्थळी पोहोचत मुलीची सुटका केली. त्यामुळे अल्पवयीन मुलीला छळातून बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले.
मुलीने विरोध केल्यानंतर तिला एका खोलीत डांबून ठेवण्यात आले. तसेच स्वयंपाक आणि धुणीभांडी करण्यास भाग पाडण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
पोलिसांकडून सखोल तपास सुरू
या प्रकरणी अंजली भारत चव्हाण, डॉ. रामधन ढाकणे आणि सुजित शिंगारे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राकेश नेटके या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा फायदा घेऊन तिच्यावर अन्याय झाल्याचा आरोप गंभीर असून, या प्रकरणातील इतर संबंधितांचा शोध घेऊन संपूर्ण रॅकेट उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
