• Tue. Nov 17th, 2026

नळापर्यंत पाणी पोहोचत नाही, रस्त्याचा पत्ताच नाही! सम्राट नगर, जयभीम नगरला मूलभूत सुविधांपासून वंचित का ठेवले? मागासवर्गीय वस्ती असल्याने प्रशासनाचा दुजाभाव? नगरपरिषद आणि ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा संताप; नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, आमदार नमिता मुंदडा लक्ष देणार का?

Bybaba maske

Nov 10, 2026

नळापर्यंत पाणी पोहोचत नाही, रस्त्याचा पत्ताच नाही! सम्राट नगर, जयभीम नगरला मूलभूत सुविधांपासून वंचित का ठेवले?

मागासवर्गीय वस्ती असल्याने प्रशासनाचा दुजाभाव? नगरपरिषद आणि ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा संताप; नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, आमदार नमिता मुंदडा लक्ष देणार का?

रोखठोक न्यूज | वार्ताहर

अंबाजोगाई : शहराला लागून असलेल्या मोरेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील सम्राट नगर आणि जयभीम नगरमधील नागरिकांची अवस्था म्हणजे ना धड रस्ता, ना नाली आणि ना नळाला पाणी! गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही वस्त्यांमधील नागरिक मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करीत असताना संबंधित प्रशासन मात्र ढिम्म असल्याचे चित्र दिसून येत आहे. मागासवर्गीय वस्ती असल्यामुळेच या भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का? असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत.

अंबाजोगाई शहरालगत मोरेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील जिओ ऑफिसपासून जाणाऱ्या रस्त्याच्या परिसरात जयभीम नगरचा काही भाग आणि सम्राट नगर या दोन वस्त्या वसलेल्या आहेत. मात्र, या वस्त्यांची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत ग्रामपंचायत असो अथवा अंबाजोगाई नगरपरिषद, कोणत्याही प्रशासनाने येथील नागरिकांना आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्याचे दिसत नाही. या दोन्ही वस्त्यांमध्ये जाण्यासाठी धड रस्ता नाही, सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी नाल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना दररोज अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

विशेष म्हणजे, मागील वर्षी यश कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून अंबाजोगाई नगरपरिषदेने धनेगाव तलावातून पाणीपुरवठा करण्यासाठी पाइपलाइनचे काम केले. नगरपरिषदेचे अधिकृत कोटेशन भरून नागरिकांनी मोठ्या अपेक्षेने स्वतःच्या घरापर्यंत नळजोडणी करून घेतली. मात्र, घरापर्यंत पाइपलाइन पोहोचली, नळही बसले; पण नळाला पाण्याचा थेंबही येत नसल्याची गंभीर परिस्थिती आहे.

पैसे भरूनही पाणी मिळत नसेल तर या नागरिकांनी न्याय मागायचा तरी कोणाकडे? संबंधितांना वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही. मग ही पाइपलाइन नेमकी कोणासाठी टाकण्यात आली? नागरिकांकडून पैसे घेऊन पाणीपुरवठाच होणार नसेल तर या कामाचा उपयोग काय? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

एकीकडे शहराच्या विकासाच्या गप्पा मारल्या जातात, तर दुसरीकडे शहरालगतच्या वस्त्यांमध्ये नागरिकांना रस्ता, नाली आणि पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे. ही केवळ प्रशासकीय उदासीनता आहे की सामाजिक भेदभावातून निर्माण झालेला दुजाभाव, याचे उत्तर प्रशासनाने देण्याची वेळ आली आहे.

कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष म्हणून ओळख असलेले नंदकिशोर (काकाजी) मुंदडा सम्राट नगर आणि जयभीम नगरच्या नागरिकांच्या या समस्यांकडे लक्ष देऊन प्रत्यक्ष पाहणी करणार का? केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई अक्षय मुंदडा या वस्त्यांमधील रस्ते आणि नाल्यांच्या प्रश्नासाठी पुढाकार घेणार का?

आता आश्वासन नको, प्रत्यक्ष काम हवे! सम्राट नगर आणि जयभीम नगरमधील पाणीपुरवठा तातडीने सुरू करावा, अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती व नूतनीकरण करावे, सांडपाण्याच्या नाल्यांची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी येथील रहिवाशांकडून होत आहे.

लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला समान मूलभूत सुविधा मिळण्याचा अधिकार आहे. मग विकासाच्या बाबतीत या वस्त्यांनाच दुय्यम वागणूक का? प्रशासनाने याचे उत्तर द्यावे, अन्यथा नागरिकांचा असंतोष अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रोखठोक न्यूज — जनसामान्यांच्या अन्यायाविरुद्ध आवाज!

baba maske

Related Post

कला केंद्राच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा छळ! डांबून ठेवून अनैतिक कृत्यांसाठी दबाव; बनावट आधारकार्ड तयार केल्याचाही आरोप, केजमध्ये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
दोन वर्षांपासून ₹१ कोटी ४९ लाखांचा रस्ता कागदावरच! निधी गेला कुठे? कंत्राटदार पोसला की सत्ताधारी आणि अधिकारी? फुलेनगरमधील सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली बांधकामाचा पत्ता नाही; नगरपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह, चौ
कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेली १५ गोवंश जनावरांची सुटका! चिंचोळीमाळी येथील पाझर तलावाजवळ पोलिसांची कारवाई; १२ बैल आणि ३ गायी ताब्यात, ३ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!