रोखठोक न्यूज | विशेष वृत्त
१ कोटी ४९ लाखांचा निधी मंजूर, तरी फुलेनगरचा रस्ता कागदावरच!
नगराध्यक्षांच्या घरासमोरील रस्ता महिनाभरात होतो, मग फुलेनगरच्या रस्त्याला दोन वर्षांपासून मुहूर्त का नाही? सत्ताधारी नगराध्यक्ष आणि गटनेते हारूणभाई इनामदार यांनी जनतेला उत्तर द्यावे!
केज | प्रतिनिधी रोखठोक न्यूज
केज नगरपंचायतीच्या कारभारात विकासकामांसाठी निधीची उपलब्धता आणि प्रत्यक्ष कामांची अंमलबजावणी यामध्ये मोठी तफावत असल्याचा गंभीर प्रश्न फुलेनगर परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत. बीड रोड ते एल.एफ.सी. चौक या मार्गावरील सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली बांधकामासाठी तब्बल १ कोटी ४९ लाख २६ हजार १६३ रुपयांची तरतूद मंजूर असतानाही गेल्या दोन वर्षांपासून हे काम प्रत्यक्षात का सुरू झाले नाही, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.नगरपंचायतीच्या कामकाजातील प्राधान्यक्रम नेमके कोणासाठी ठरवले जातात? नगराध्यक्षांच्या घरासमोरील रस्ता बजेट नसतानाही नगरपंचायतीची निवडणूक झाल्यानंतर अवघ्या महिनाभरात होऊ शकतो, मग फुलेनगरच्या नागरिकांसाठी मंजूर असलेला कोट्यवधी रुपयांचा रस्ता दोन वर्षे कागदावरच का अडकून पडला आहे?
सत्ताधाऱ्यांसाठी वेगळा न्याय आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगळा न्याय आहे का?
सत्ताधारी नगराध्यक्ष आणि गटनेते हारूणभाई इनामदार यांनी या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर द्यावे. निधी मंजूर असेल तर काम सुरू का झाले नाही? प्रशासकीय अडथळे आहेत का? निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे का? की विकासकामांच्या नावाखाली केवळ कागदोपत्री आकड्यांचीच जुळवाजुळव सुरू आहे?फुलेनगरमधील नागरिकांना आश्वासनांचे गाजर नको, तर प्रत्यक्ष रस्ता आणि नालीचे काम हवे आहे. मंजूर निधीचा विनियोग कधी होणार आणि काम सुरू करण्याची निश्चित तारीख कोणती, हे नगरपंचायतीने जाहीर करावे.
१ कोटी ४९ लाखांचा निधी मंजूर असताना रस्ता होत नसेल, तर जबाबदार कोण?
जनतेच्या पैशातून मंजूर झालेला निधी हा कोणाच्या वैयक्तिक मालकीचा नाही. त्यामुळे या कामाची सद्यस्थिती, विलंबाची कारणे आणि काम पूर्ण करण्याची कालमर्यादा जनतेसमोर मांडण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची आहे.
रोखठोक सवाल : नगराध्यक्षांच्या घरासमोरील रस्त्याला महिनाभरात न्याय आणि फुलेनगरच्या रस्त्याला दोन वर्षे प्रतीक्षा, हा नेमका विकासाचा कोणता न्याय?
रोखठोक न्यूज — जनसामान्यांच्या अन्यायाविरुद्ध आवाज!
