• Sun. Nov 22nd, 2026

बेफाम ट्रॅव्हल्सचा वेग ठरला तरुणाच्या जीवावर बेतणारा! ट्रॅक्टरला पाठीमागून भीषण धडक; केजच्या १८ वर्षीय गणेशचा उपचारादरम्यान मृत्यू, तीन मित्र गंभीर!

Bybaba maske

Nov 20, 2026

बेफाम ट्रॅव्हल्सचा वेग ठरला तरुणाच्या जीवावर बेतणारा!

ट्रॅक्टरला पाठीमागून भीषण धडक; केजच्या १८ वर्षीय गणेशचा उपचारादरम्यान मृत्यू, तीन मित्र गंभीर!

रोखठोक न्यूज वार्ताहर

बीड : खाजगी ट्रॅव्हल्स चालकांच्या बेफाम वेगाला आणि बेजबाबदारपणाला आणखी किती निष्पाप तरुणांचे बळी हवे आहेत? वेगमर्यादेचे उल्लंघन, वाहतुकीच्या नियमांना केराची टोपली आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची उघडपणे होणारी पायमल्ली याचा भीषण प्रत्यय बीडजवळील म्हसोबा फाटा येथे आला. भरधाव खाजगी ट्रॅव्हल्सने ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात केजच्या १८ वर्षीय गणेश अनिल शिंदे याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याचे तीन मित्र गंभीर जखमी झाले आहेत.

गणेश अनिल शिंदे (वय १८, रा. शुक्रवार पेठ, केज) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर कृष्णा मधुकर शिंदे (वय २४, रा. गांधीनगर, केज), विजय ज्ञानोबा देडे (वय २६) आणि सिद्धेश्वर चंद्रकांत हातवाडे (वय २७) हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूरहून केज, बीडमार्गे शिर्डीकडे जाणारी खाजगी ट्रॅव्हल्स बुधवारी (दि. १८) मध्यरात्री बारा ते एकच्या सुमारास बीड तालुक्यातील म्हसोबा फाटा परिसरातून भरधाव वेगाने जात होती. याचवेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्सने समोरून जाणाऱ्या ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.

या ट्रॅव्हल्समध्ये चालकाच्या बाजूला बसलेल्या गणेश आणि त्याच्या तीन मित्रांना अपघाताचा जबर फटका बसला. घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर जखमी झालेल्या गणेशची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. अवघ्या १८व्या वर्षी त्याचा दुर्दैवी अंत झाल्याने केज परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ट्रॅव्हल्स चालकांच्या मनमानीला लगाम कधी?

खासगी ट्रॅव्हल्स चालकांचा महामार्गावरील बेफाम वेग, क्षमतेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविण्याची प्रवृत्ती आणि प्रवाशांच्या सुरक्षेबाबतचा निष्काळजीपणा हा गंभीर प्रश्न बनला आहे. रात्रीच्या प्रवासात वेगावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी चालकांची असताना अशा अपघातांमुळे प्रवाशांचे जीव धोक्यात येत आहेत.

या प्रकरणात ट्रॅव्हल्स चालकाची नेमकी चूक काय होती, वाहनाचा वेग किती होता, वाहनाची तांत्रिक स्थिती काय होती आणि नियमांचे पालन झाले होते का, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. आरटीओ आणि वाहतूक पोलिसांच्या तपासणी व देखरेखीवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

एका १८ वर्षीय तरुणाचा जीव गेला, तीन कुटुंबांवर संकट कोसळले! आता तरी प्रशासन जागे होणार का? बेफाम वेगाने धावणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सवर कठोर कारवाई होणार का? की आणखी एखाद्या निष्पाप प्रवाशाचा बळी गेल्यानंतरच यंत्रणा जागी होणार?

हा केवळ अपघात नाही, तर महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न आहे. प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने पाहून दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, हीच अपेक्षा.

रोखठोक न्यूज – जनसामान्यांच्या अन्यायाविरुद्ध आवाज!

baba maske

Related Post

केज १३२ के.व्ही. उपकेंद्रात भीषण आग! कॅपेसिटर डीपीला आग लागल्याने परिसरात खळबळ
रोखठोक न्यूज | विशेष वृत्त १ कोटी ४९ लाखांचा निधी मंजूर, तरी फुलेनगरचा रस्ता कागदावरच! नगराध्यक्षांच्या घरासमोरील रस्ता महिनाभरात होतो, मग फुलेनगरच्या रस्त्याला दोन वर्षांपासून मुहूर्त का नाही? सत्ताधारी नगराध्यक्ष आणि गटनेते हारूणभाई इनामदार यांनी जनतेला उत्तर द्यावे!
रोहित पठारे हत्याप्रकरणी अंबाजोगाईत आक्रोशाचा एल्गार! निर्घृण हत्येचा तीव्र निषेध; जातीय अत्याचारांना आळा घालण्याची मागणी, उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!