रोहित पठारे हत्याप्रकरणी अंबाजोगाईत आक्रोशाचा एल्गार!
निर्घृण हत्येचा तीव्र निषेध; जातीय अत्याचारांना आळा घालण्याची मागणी, उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अंबाजोगाई, दि. १७ (प्रतिनिधी) रोखठोक न्यूज
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे रोहित अनिल पठारे या २४ वर्षीय तरुणाची झालेली निर्घृण हत्या संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी ठरली आहे. या अमानुष हत्येच्या निषेधार्थ अंबाजोगाईत आक्रोश मोर्चा काढून संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या. जातीय विद्वेषातून होणाऱ्या हत्या, अन्याय आणि अत्याचारांविरोधात आवाज बुलंद करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
वैजापूर येथे गणेश मंडळांच्या वादातून रोहित पठारे यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप असून, त्यांना झाडाला बांधून तलवार, लोखंडी रॉड आणि कुऱ्हाडीने अमानुष मारहाण केल्याचे वृत्त आहे. गंभीर जखमी झालेल्या रोहित यांचा ३ नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने माणुसकीला काळिमा फासला असून समाजमनातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अंबाजोगाईतील आंदोलनादरम्यान जातीय अत्याचारांना आळा घालण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत, दलित व शोषित समाजावरील अन्याय थांबवावा आणि पीडित कुटुंबांना न्याय द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या. तसेच अंबाजोगाईतील बेघर झालेल्या नागरिकांचे युद्धपातळीवर पुनर्वसन करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली.
यावेळी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. या निवेदनावर कॉ. बब्रुवाहन पोटभरे, बहुजन विकास मोर्चाचे विनोद शिंदे, अभिमान कुंडाळ, बाबा शेख, सुहास चंदनशिव, प्रशांत मस्के यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आंदोलनात महिला, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रोहित पठारे यांना न्याय मिळणार कधी? दोषींना कठोर शिक्षा होणार कधी? हा प्रश्न आज समाजमनाला अस्वस्थ करणारा आहे. केवळ निषेध आणि आश्वासनांवर न थांबता अशा अमानुष घटनांना कायमचा आळा घालण्यासाठी शासनाने ठोस कृती करावी, अशी जनभावना या आंदोलनातून व्यक्त झाली.
रोखठोक न्यूज – जनसामान्यांच्या अन्यायाविरुद्ध आवाज!
