मोटारसायकलची समोरासमोर धडक; दोन ठार,एक जखमी
लग्न होऊन 10 महिने झाल्याने कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला
रोखठोक न्युज वार्ताहर
अंबाजोगाई – अंबासाखर कारखाना रोडवरील सातेफळ फाट्यानजीक मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाल्याची घटना बुधवार दि.27 मार्च रोजी सायंकाळी घडली आहे. या झालेल्या अपघातात दोन जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. सुशांत सुनील ठाकूर (वय 23,पाटोदा, म.) ता, अंबाजोगाई व बालाजी भुजबळ (वय – 30, रा. जोडजवळा, जिल्हा लातूर,असं अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नाव आहेत. शिवहर भुजबळ हे जखमी झाले आहेत
अंबासाखर कारखाना ते देवळा रोडवर असलेल्या सातेफळ फाट्यानजीक मोटारसायकल क्रमांक MH 11CU2758 आणि MH24BS9183 समोरासमोर अपघात झाला. अपघात इतका भयानक होता की दोन्ही मोटारसायकलचा हेडलाईटच्या भागाचे अक्षरशः टुकडे टुकडे झाले होते. अपघाताची माहिती समजताच परिसरातील कुंबेफळ,सातेफळ, ममदापुर, पाटोदा येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातातील जखमींना अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान अपघातातील दोघे मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.) हे सुशांत ठाकूर याचे आजोळ असून तो चनई येथील रहिवासी आहे. सुशांत याचे में 2023 रोजी ममदापुर(पा.) येथील मुलीसोबत लग्न झालेलं आहे. अगदी लग्न होऊन 10 महिने झाल्याने कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सुशांत ठाकूर हा त्याचा मोटारसायकलवर बसून अंबाजोगाईकडे जात होता याच दरम्यान बालाजी भुजबळ व शिवहर भुजबळ हे अंबाजोगाईहुन त्यांच्या जोडजवळा या गावी जात असताना सातेफळ फाट्यावर सामोरा समोर अपघात झाला.
