• Sat. Sep 12th, 2026

स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Bybaba maske

Sep 12, 2026

 स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

११ केव्ही वाहिनीच्या संपर्कात बूम पंप; दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू, घटनेनंतर संतप्त जमावाची वाहनावर दगडफेक

अंबाजोगाई/प्रतिनिधी : अंबाजोगाई शहरातील पंचायत समितीसमोर हनुमान नगर मुख्य रस्त्यावर सुरू असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या बांधकामावर आज दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली. दुसऱ्या मजल्याच्या स्लॅबची भराई सुरू असताना काँक्रिट बूम पंपचा पाईप ११ केव्ही उच्चदाब विद्युत वाहिनीच्या संपर्कात आल्याने दोन मजुरांना विजेचा जोरदार धक्का बसला. या दुर्घटनेत दोन्ही मजुरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, यश कंस्ट्रक्शन कंपनीचे काँक्रिट बूम पंप वाहन (MH 44 AC 3044) रस्त्यावर उभे करून स्लॅब भराईचे काम सुरू होते. यावेळी बूमचा पाईप अचानक ११ केव्ही विद्युत तारांच्या संपर्कात आला. त्यावेळी स्लॅबवर काम करणाऱ्या मजुरांना विजेचा जबरदस्त धक्का बसला.

या दुर्घटनेत बबन चंद्रकांत वाघमारे (वय ५०, रा. हमाल गल्ली, अंबाजोगाई) आणि यशवंत कोंडीराम वाघमारे (वय ३३) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.

दोन कुटुंबांचा आधार हरपला

मयत बबन वाघमारे हे कुटुंबातील प्रमुख होते. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि एक विवाहित मुलगी आहे. तर यशवंत वाघमारे यांच्या पश्चात दोन लहान मुले आहेत. एकाच दुर्घटनेत दोन कुटुंबांचा आधार हिरावला गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दुर्घटनेनंतर संतापाचा उद्रेक

दुर्घटनेची माहिती समोर येताच परिसरात मोठी गर्दी झाली. संतप्त जमावाने काँक्रिट पंप वाहनावर दगडफेक केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला.

दरम्यान, पोलिसांनी वाहन चालक तसेच ऑपरेटर विश्वनाथ चव्हाण (रा. झारखंड) यांना ताब्यात घेतले असून, अंबाजोगाई शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

बांधकामाच्या ठिकाणी विद्युत वाहिनीच्या धोक्याची योग्य खबरदारी घेण्यात आली होती का? बूम पंप उभारताना सुरक्षित अंतर राखण्यात आले होते का? या दुर्घटनेला नेमकी कोणाची जबाबदारी आहे? या प्रश्नांची उत्तरे आता पोलीस तपासातून समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे.

रोखठोक न्यूज — जनसामान्यांच्या अन्यायाविरुद्ध आवाज

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!