• Sat. Apr 18th, 2026

दोन चिमुकल्यांचा जीव घेऊन आईचा आत्महत्येचा प्रयत्न

Bybaba maske

May 12, 2024

दोन चिमुकल्यांचा जीव घेऊन आईचा आत्महत्येचा प्रयत्न

रोखठोक न्युज वार्ताहर 

अंबाजोगाई – स्वयंपाक जास्त का केलास असे सासूने विचारल्याचा राग आल्याने विवाहितेने स्वतःच्या दोन्ही लेकरांना विषारी औषध पाजवून त्यांचा जीव घेत नंतर स्वतःही विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथे शुक्रवारी (दि.१०) रात्री घडली. 

कौशल्या भीमराव दोडतले (वय २३, रा. टेकडी गल्ली, बर्दापूर) असे त्या विवाहितेचे नाव आहे. शुक्रवारी रात्री तिचा पती भीमराव हा धनंजय मुंडे यांच्या सभेला गेला होता. यावेळी घरात असलेल्या सासूने स्वयंपाक जास्त का केलास असे कौशल्याला विचारले. त्यामुळे रागात आलेली कौशल्या मुलगा कार्तिक (वय २) आणि मुलगी प्रांजल (वय ३) यांना घेऊन स्वतःच्या खोलीत गेली. तिथे तिने दोन्ही मुलांना विषारी औषध पाजविले. सभा संपून भीमराव घरी आल्यानंतर आईने त्याला कौशल्या रुसून खोलीत बसल्याचे सांगितले. त्यानंतर भीमराव खोलीत गेला असता त्यास मुलांच्या नाकाला फेस आल्याचे दिसले. त्यावर मुलांच्या नाकाला व्हॅसलिन लावल्याचे कौशल्याने सांगितले. परंतु, मुलांच्या नाकातून रक्तही येत असल्याने आणि मुलांची काहीच हालचाल दिसत नसल्याने घाबरलेल्या भीमरावने मुलांना खांद्यावर घेत बाहेर आणले आणि आरडाओरडा करून गल्लीतील लोकांना बोलावले. यावेळी कौशल्याने वरच्या खोलीत जाऊन विषारी औषध प्राशन केले. भीमराव आणि इतरांनी तिघांनाही घेऊन लातूरच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तपासून कार्तिक आणि प्रांजल यांना मयत घोषित केले. तर, कौशल्यावर उपचार असून तिची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी भीमरावच्या फिर्यादीवरून पत्नी कौशल्यावर बर्दापूर पोलीस ठाण्यात कलम ३०२ अन्वये बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपस पीएसआय ठाकूर करत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!