केज बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला; अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल
रोखठोक न्यूज वार्ताहर
दि. ४ – बसस्थानकावर लातूर ते छत्रपती संभाजीनगर बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी प्रभाविती तुळसीराम मुकदम (वय ५८, रा. युसुफवडगाव, ता. केज) यांनी केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी महिला १४ जून २०२६ रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास युसुफवडगाव येथून बीडला जाण्यासाठी केज बसस्थानकावर आल्या होत्या. यावेळी त्यांच्या पर्समध्ये सोन्याचे दागिने आणि ५ हजार रुपये रोख रक्कम होती. दुपारी १२ च्या सुमारास लातूर ते छत्रपती संभाजीनगर बस आली असता, बसमध्ये खूप गर्दी होती. बसमध्ये चढून सीटवर बसल्यानंतर, तिकीट काढण्यासाठी पर्स उघडली असता, ती आधीच उघडी असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
पर्समधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम गायब असल्याचे पाहून महिलेला धक्काच बसला. चोरीला गेलेल्या ऐवजामध्ये २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे वेल, २७ हजार ५०० रुपये किमतीची झुंबर व कर्णफुले, ३५ हजार रुपये किमतीचे मणीमंगळसूत्र आणि ५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ८७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे.
दरम्यान, प्रकृती ठीक नसल्याने उशिराने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.केज बसस्थानकत नेहमीच अशा घटना घडत असताना सदरील चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात केज पोलिसांना अद्याप तरी जमलेले नाही.
