जीव लावला की लूट सुरूच !
रोखठोक न्यूज
कला केंद्रामध्ये केवळ राजकीय नेतेच जातात असं नव्हे, मोठे व्यापारी अन् थोड़ा पैसा हातात खेळणारे सामान्य लोकही तेथे जाऊन जिवाची करमणूक करून घेतात; पण तिथे गेलेल्या ‘मदना’ला जर कला केंद्रात नाचणाऱ्या ‘मंजिरी’चा बाण लागला की, मदनाची लूट सुरू होते ती अगदी भिकारी होईपर्यंत हा दुर्दैवी अनुभव असेच लुटून घेतलेल्या लोकांनी सांगितला, नाव न जाहीर करण्याच्या अटीवर
बीड जिल्ह्यातील लुखामसला (ता. गेवराई) येथील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर कलाकेंद्र चर्चेत आले. तिथल्या नर्तकीनं गोविंदची लूट सुरू केली होती, असा आरोप झाला आहे. यावरून सोलापुरातील तिथे गेलेल्या लोकांनी लुटालूट कशी होते, याचे स्वानुभव सांगितले. कलाकेंद्रात गेल्यानंतर एखाद्या नर्तकीचं सौंदर्य किंवा नृत्य भावलं की त्याच्यातील ‘मदन’ जागृत होतो अन् तो तिच्याशी संपर्क साधतो, मग मोबाइल नंबरची देवाणघेवाण होते. ती दिवसा भेटायला बोलावते अन् जीव लावायला सुरुवात करते. यातून ती एक एक वस्तू मोठ्या प्रेमाने मागायला लागते. समोरचा माणूस कसा पगळतो, त्यावरून डिमांड मोठी मोठी होत जाते. त्याचवेळी ती ‘मंजिरी’ अनेकांना असंच लुटत असते. तिच्या या प्रेमाला ‘जीव लावणं’ असे संबोधले जाते.अश्या या ‘मंजिरी’ मुळे आतापर्यंत किती तरी संसार उद्ध्वस्त झाले आहेत.किती तरी ‘मदन’ देशोधडीला लागले आहेत जे सावरले ते सावरले बाकीचे बरबाद झाले आहेत
या जीव लावण्यातून गोविंद यांनी म्हणे असंच स्वतःला लुटून घेतलं. त्यांच्या नातेवाइकांनीही हा आरोप केला.
मॉलमध्ये खरेदी
कलाकेंद्रातील प्रेयसीचा अनुभव एकाने सांगितला.. एकदा म्हणे, ती सोलापुरातील मोठ्या मॉलमध्ये गेली होती. तिने महागडे कपडे, परफ्यूम, किराणा आदी वस्तू खरेदी केल्या.. मला फोन करून यूपीआयवर पैसे मागवून घेतले अन् मला रिकामं केलं.. पुढं तिची डिमांड वाढतच गेली, पण चांगल्या मित्राच्या सहवासामुळे मी यातुन सुटलो.
