• Sat. Jun 13th, 2026

ऽऽबस झाल्या घोषणांच्या रिकाम्या तुताऱ्या; आता हव्यात कार्यान्वित मुताऱ्या..! “सामुदायिक मूत्रविसर्जन” आंदोलनाची चर्चा जोरात

Bybaba maske

Apr 21, 2026

ऽऽबस झाल्या घोषणांच्या रिकाम्या तुताऱ्या; आता हव्यात कार्यान्वित मुताऱ्या..!

“सामुदायिक मूत्रविसर्जन” आंदोलनाची चर्चा जोरात

रोखठोक न्यूज वार्ताहर | केज

केज शहरातील नागरिकांसमोर सध्या एक मूलभूत आणि गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे—सार्वजनिक शौचालये आणि मुताऱ्या नेमक्या कुठे आहेत? नैसर्गिक गरज भागवण्यासाठी नागरिकांना अक्षरशः ठिकाण शोधत भटकावे लागत आहे.

शहरातील बसस्थानक परिसरातील एकमेव मुतारी वगळता, मंगळवार पेठ, कानडी रोडसारख्या गजबजलेल्या बाजारपेठांमध्येही कोणतीही सार्वजनिक स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध नाही. भवानी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, तसेच मौलाना अबुल कलाम आझाद चौक मार्गे जाणाऱ्या मुख्य रस्त्यांवरही हीच अवस्था पाहायला मिळते.

काही वर्षांपूर्वी तात्पुरत्या स्वरूपात मुताऱ्या उभारण्याचा प्रयोग झाला होता; मात्र तो केवळ दिखावा ठरल्याची नागरिकांची भावना आहे.

शहराच्या विकासाचा दर्जा त्याच्या स्वच्छतेवरून ओळखता येतो, असे संत गाडगे बाबा यांनी सांगितले होते. मात्र केज शहरात आजही मूलभूत स्वच्छता सुविधा नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. बाजारपेठेत सुविधा नसल्याने व्यापारी आणि ग्राहक दोघांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीचे लक्ष वेधण्यासाठी “सामुदायिक मूत्रविसर्जन” आंदोलन उभारण्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. हा मुद्दा केवळ अस्वच्छतेचा नसून सार्वजनिक आरोग्याशी थेट संबंधित आहे.

विशेषतः महिलांसाठी ही परिस्थिती अत्यंत त्रासदायक ठरत आहे. आठवड्याच्या बाजारात मोठ्या संख्येने महिला व्यापारी सहभागी होतात, मात्र त्यांच्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना दिवसभर हालअपेष्टा सहन कराव्या लागतात.

नगरपंचायतीत महिला नगराध्यक्ष असतानाही या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याची टीका होत आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही या मुद्द्यावर ठोस भूमिका घेण्याची गरज असून, केवळ आश्वासनांवर न थांबता तातडीने कृती करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

आता तरी नगरपंचायत प्रशासन जागे होणार का, की नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!