• Fri. Sep 11th, 2026

केज पंचायत समितीचे मैदान बनले कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंड! घंटागाड्या गायब; नागरिकांचा संताप अनावर, गणेशोत्सवाच्या तोंडावर दुर्गंधी आणि रोगराईचा धोका

Bybaba maske

Sep 1, 2026

केज पंचायत समितीचे मैदान बनले कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंड!

घंटागाड्या गायब; नागरिकांचा संताप अनावर, गणेशोत्सवाच्या तोंडावर दुर्गंधी आणि रोगराईचा धोका

रोखठोक न्यूज वार्ताहर 

केज शहरातील मध्यवर्ती भागात असलेले पंचायत समितीचे मैदान हे आठवडी बाजार तसेच विविध क्रीडा उपक्रमांसाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून हेच मैदान वॉर्ड क्रमांक ५ आणि ६ मधील घरगुती कचरा टाकण्याचे अनधिकृत डम्पिंग ग्राउंड बनले आहे. नगरपंचायतीच्या कचरा व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना अखेर घरातील कचरा मैदानावर आणून टाकण्याची वेळ आली आहे.

वॉर्ड क्रमांक ५ व ६ मधील नागरिकांसाठी घरगुती कचरा संकलित करण्यासाठी नगरपंचायतीकडून घंटागाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, गेल्या दोन-तीन महिन्यांपासून घंटागाड्या नियमितपणे फिरकत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. याबाबत संबंधित नगरसेवकांना वारंवार माहिती देऊनही समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

घरात अनेक दिवस कचरा साठून राहिल्याने दुर्गंधी, मच्छर आणि रोगराईचा धोका वाढला आहे. त्यामुळे नाईलाजाने काही नागरिकांनी पंचायत समितीच्या मैदानावर कचरा टाकण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी कचरा टाकला म्हणून त्यांना दोष देण्यापेक्षा, कचरा उचलण्याची जबाबदारी असलेली यंत्रणा कुठे आहे? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.

मैदानालगतच कार्यालये आणि निवासी परिसर

विशेष म्हणजे या मैदानाच्या परिसरात शिक्षकांची शिक्षक पतपेढी, गट साधन केंद्राचे कार्यालय, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचे निवासस्थान तसेच वॉर्ड क्रमांक ६ मधील नागरिकांची घरे आहेत. त्यामुळे कचऱ्याचा वाढता ढीग हा केवळ अस्वच्छतेचा प्रश्न नसून सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या बनली आहे.

सध्या पाऊस नसल्याने परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात दिसत असली तरी पाऊस पडून कचरा भिजल्यानंतर संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरण्याची शक्यता आहे. साचलेल्या कचऱ्यामुळे मच्छर व इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढून विविध आजारांना निमंत्रण मिळण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

गणेशोत्सवाच्या तोंडावर प्रशासनाची परीक्षा!

अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. याच पंचायत समितीच्या मैदानावर राजमुद्रा गणेश मंडळाची स्थापना होते. गणेशोत्सवाच्या काळात केज शहरासह आजूबाजूच्या गावांमधून आणि जिल्हाभरातून भाविक येथे येतात. मात्र, याच मैदानावर कचऱ्याचे ढीग पडलेले राहिले तर गणेशभक्तांचे स्वागत फुलांनी नव्हे, तर कचऱ्याच्या दुर्गंधीने होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

नगरपंचायत प्रशासन जागे होणार तरी कधी?

शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नगरपंचायतीची असताना नागरिकांना कचरा टाकण्यासाठी जागा शोधण्याची वेळ येत असेल, तर कचरा व्यवस्थापनाच्या नियोजनाचा नेमका फायदा काय? असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.

सन्माननीय नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि संबंधित नगरपंचायत अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन वॉर्ड क्रमांक ५ व ६ मधील घरगुती कचरा नियमितपणे उचलण्यासाठी तातडीने नियोजन करावे. संबंधित कंत्राटदाराला घंटागाड्या नियमित सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश द्यावेत आणि पंचायत समितीच्या मैदानावर साचलेला कचरा त्वरित हटवावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

अन्यथा गणेशोत्सवाच्या काळात या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा तसेच भाविकांच्या गैरसोयीचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची? असा थेट सवालही नागरिकांनी प्रशासनाला केला आहे.

baba maske

Related Post

धाराशिव ब्रेकिंग : मराठा आंदोलकांनी जाळली उमरगा तहसीलदारांची खुर्ची!मनोज जरांगे यांच्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप; आंदोलन पोलिसांच्या ताब्यात, घटनेने एकच खळबळ
केज पोलिसांची मोठी कारवाई! १४.८८ लाखांचा ७४.४३२ किलो गांजा जप्त; आरोपी जेरबंदकेवड गायरान परिसरात छापा; सुनील शिवाजी पवार याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा
खरा मालक अंधारात ठेवून बनावट मालक व बोगस कागदात्राद्वारे प्लॉटचे खरेदी खत केले ; तिघा विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!