रोखठोक न्यूज | धक्कादायक दरोड्यांचा पर्दाफाश
पद्धत तीच, ठिकाण बदलून वाहनांवर दरोडा!
कळंब-वाशीतील दरोडेखोरांची समृद्धी महामार्गापर्यंत मजल; १८ लाखांची लूट, नाशिक पोलिसांची धडक कारवाई, सात जण जेरबंद
रोखठोक न्यूज नाशिक :
वाहन पंक्चर करून प्रवाशांना अडवायचे, त्यांच्यावर हल्ला करून रोकड व मौल्यवान वस्तू लुटायच्या… दरोड्याची हीच पद्धत वापरणाऱ्या कळंब-वाशी परिसरातील टोळीने आता थेट समृद्धी महामार्गापर्यंत मजल मारल्याचे समोर आले आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश करत सात संशयित आरोपींना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून दोन एसयूव्ही वाहने जप्त करण्यात आली आहेत.
अशी होती दरोड्याची मोडस ऑपरेंडी
येरमाळा-धुळे-सोलापूर महामार्गासह कळंब आणि वाशी तालुक्यातील संशयित ठिकाणी वाहनांवर लक्ष ठेवून प्रवाशांना हेरले जात होते. वाहन पंक्चर झाल्यानंतर प्रवासी खाली उतरले की, त्यांच्यावर हल्ला करून रोकड व इतर ऐवज लुटला जात असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
नाशिक ग्रामीण पोलिसांनी केलेल्या तपासात समृद्धी महामार्गावरील वाहन लुटीच्या प्रकरणाचा धागा कळंब-वाशी परिसरातील आरोपींपर्यंत पोहोचला. पोलिसांनी कारवाई करत सात जणांना बेड्या ठोकल्या.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे
1. अर्जुन व्यंकट पवार — रा. येरमाळा
2. सुनील हिरामण शिंदे — रा. खामकरवाडी
3. धनाजी अर्जुन पवार — रा. येरमाळा
4. गोविंद शिवाजी पवार — रा. लक्ष्मी पेठी
5. अशोक हिरामण शिंदे — रा. खामकरवाडी
6. गोविंद व्यंकट पवार — रा. उमरा
7. लखन भारत काळे — रा. खामकरवाडी
धुळे-सोलापूर महामार्गापासून समृद्धी महामार्गापर्यंत
पोलिसांच्या माहितीनुसार, या परिसरातील काही गुन्हेगारांकडून यापूर्वी धुळे-सोलापूर महामार्गावर रात्रीच्या वेळी वाहन अडवून लुटीच्या घटना घडल्याचे तपासात समोर आले होते. आता याच टोळीने समृद्धी महामार्गावरही वाहनांना लक्ष्य केल्याचे निष्पन्न झाले आहे.
सुमारे १८ लाख रुपयांच्या लुटीच्या प्रकरणाचा तपास करताना नाशिक ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपींकडून आणखी किती गुन्हे उघडकीस येतात, याकडे पोलिसांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.
समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
समृद्धी महामार्गावर वाहन पंक्चर करून प्रवाशांना लुटण्याच्या घटना समोर आल्याने महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी संशयास्पद व्यक्ती अथवा वाहन दिसल्यास सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
रोखठोक न्यूज
जन सामान्याच्या अन्यायाविरोधात आवाज
