फेरफारासाठी ‘एक लाख’! अंबाजोगाईत मंडळ अधिकाऱ्याला एसीबीचा दणका
लाच मागितल्याचे पडताळणीत निष्पन्न; रक्कम स्वीकारण्यापूर्वीच कारवाई, महसूल विभागात खळबळ
रोखठोक न्यूज अंबाजोगाई | प्रतिनिधी
शेतीच्या फेरफाराची नोंद करून देण्यासाठी चक्क एक लाख रुपयांची लाच मागणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दणका दिला आहे. सतीश विठ्ठलराव भुसेवाड (वय ४१, रा. बानाई नगर, अंबाजोगाई) असे कारवाई झालेल्या मंडळ अधिकाऱ्याचे नाव आहे. तो अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथे कार्यरत होता.
तक्रारदाराच्या शेतीच्या फेरफार नोंदीची कार्यवाही करून देण्यासाठी भुसेवाड याने एक लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदाराने बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची दखल घेत एसीबीच्या पथकाने या प्रकरणाची पडताळणी केली. या पडताळणीत मंडळ अधिकारी सतीश भुसेवाड याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, एसीबीच्या कारवाईचा संशय आल्याने भुसेवाड याने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. मात्र, लाचेची मागणी केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ही कारवाई बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सतीश भुसेवाड याच्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत असून, महसूल विभागातील या कारवाईमुळे अंबाजोगाई परिसरात खळबळ उडाली आहे.
रोखठोक सवाल :
शेतकऱ्याच्या जमिनीच्या फेरफारासारख्या नियमित महसुली कामासाठी जर लाखाची मागणी होत असेल, तर सामान्य नागरिकांनी न्याय मागायचा तरी कुणाकडे?
