केजमध्ये फिल्मी ड्रामा! दुचाकी चोराचा ‘डॉन’गिरीचा थाट; म्हणाला – “मैं केज का बड़ा डॉन हूँ, नाम है जुबेर उर्फ मारी!”
दुचाकी चोरताना पकडले; धारदार शस्त्राचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी, नागरिकांनी दिला चोरट्याला ‘प्रसाद’
रोखठोक न्यूज प्रतिनीधी
केज शहरात दुचाकी चोरी करताना पकडलेल्या चोरट्याने चक्क “मैं केज का बहोत बड़ा डॉन हूँ!” अशी डायलॉगबाजी करत धारदार शस्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, नागरिकांच्या धाडसापुढे या ‘डॉनगिरी’चा फार काळ टिकाव लागला नाही. दुचाकी सोडून पळून जाणाऱ्या आरोपीला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले.
नेमकं काय घडलं?
एकुरका येथील बाळासाहेब निवृत्ती ठोंबरे यांनी त्यांची मोटारसायकल क्रमांक MH-44/Y-7379 केज-बीड मुख्य रस्त्यावरील कीर्ती जनरल स्टोअर्ससमोर लावली होती. ते दुकानात गेले असताना एका इसमाने दुचाकीचे लॉक तोडून ती चोरून नेण्याचा प्रयत्न केला.
दुकानातून बाहेर आल्यानंतर ठोंबरे यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तत्काळ चोरट्याचा पाठलाग करून त्याला पकडले. मात्र, पकडले जाताच आरोपीने खिशातून धारदार शस्त्र काढत ठोंबरे यांना धमकावण्यास सुरुवात केली.
“तु मुझे पहेचानता नही क्या? मैं केज का बहोत बडा डॉन हु! मेरा नाम जुबेर उर्फ मारी है, तुझे मैं खल्लास कर दुंगा!” अशी धमकी देत आरोपीने शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
‘डॉन’गिरीचा शेवट नागरिकांच्या हातात!
आरोपीच्या धमक्यांमुळे परिसरात आरडाओरड झाली. आवाज ऐकून नागरिक घटनास्थळी जमा झाले. नागरिकांची गर्दी पाहताच आरोपीने दुचाकी सोडून तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाळासाहेब ठोंबरे आणि नागरिकांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले.
चोरी, त्यानंतर शस्त्राचा धाक आणि ‘डॉन’गिरीची भाषा असा या संपूर्ण प्रकारामुळे केज शहरात चर्चेला उधाण आले आहे.
पोलिसांची तातडीने कारवाई
या प्रकरणी बाळासाहेब ठोंबरे यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात आरोपी जुबेर उर्फ मारी याच्याविरुद्ध गु.र.नं. 562/2026 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे उपनिरीक्षक लक्ष्मण किर्तने आणि अमिरोद्दीन इनामदार यांनी आरोपीला ताब्यात घेतले.
दुचाकी चोरी करताना रंगेहात पकडला गेला आणि त्यानंतर ‘डॉन’गिरीचा धाक दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीची अखेर नागरिकांनीच डॉनगिरी उतरवली, अशी चर्चा सध्या केज शहरात रंगली आहे.
