अंबाजोगाईत चोरट्यांचा धुमाकूळ! भरदिवसा महिलेच्या गळ्यातून १.५४ लाखांचे सोन्याचे गंठण लंपास
काळ्या दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांचा धुमाकूळ; १ लाख ५४ हजारांचा ऐवज लंपास, मास्कधारी चोरटे पसार
अंबाजोगाई | प्रतिनिधी रोखठोक न्यूज
अंबाजोगाई शहर आणि परिसरात चोरट्यांची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे. मोरेवाडी परिसरातील जिजाऊनगर पाटीजवळ सायंकाळच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातील तब्बल १ लाख ५४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनीगंठण दोन अज्ञात चोरट्यांनी जबरीने हिसकावून नेले. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पारिजात कॉलनी, अंबाजोगाई येथील रहिवासी आशा भारतराव चौधरी (वय ५५) या चनई येथे जाण्यासाठी मोरेवाडी परिसरातील जिजाऊनगर पाटीजवळ उभ्या होत्या. मुलगा वाहन घेऊन येण्याची त्या वाट पाहत असतानाच काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून दोन अज्ञात इसम पाठीमागून आले.
क्षणात गंठण हिसकावले अन् चोरटे सुसाट!
दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या चोरट्याने आशा चौधरी यांच्या गळ्यातील गोपाची साखळी डिझाईन, दोन मंगळसूत्र आणि चार मणी असलेले सुमारे २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनीगंठण जोरदार हिसका मारून तोडून घेतले.
महिलेच्या लक्षात प्रकार येताच त्यांनी आरडाओरड केली. मुलासह चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेले दोन्ही चोरटे क्षणार्धात सुसाट वेगाने पसार झाले.
मास्कधारी चोरटे; कपड्यांवरून पोलिसांना धागेदोरे मिळणार?
चोरट्यांनी चेहऱ्यावर मास्क लावले होते. दुचाकी चालवणाऱ्या इसमाने पिवळ्या रंगाचा शर्ट, तर पाठीमागे बसलेल्या चोरट्याने आकाशी रंगाचा शर्ट परिधान केला होता, अशी माहिती फिर्यादीत नमूद करण्यात आली आहे.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये दिवसा देखील महिलांनी दागिने घालून रस्त्यावर फिरावे की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा माग काढण्याची गरज आहे.
अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी आशा भारतराव चौधरी यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात इसमांविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश भिव्हा घुले करत आहेत.
भरदिवसा महिलेच्या गळ्यातून सोन्याचे गंठण हिसकावून चोरटे पसार झाल्याने अंबाजोगाई शहरात पुन्हा एकदा चोरीच्या घटनांवर आळा घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
