अंबाजोगाई न्यायालयात थरारनाट्य!
न्यायदान सुरू असतानाच आरोपीने अंगावर ओतले पेट्रोल; आगपेटी काढताच वकिलांची धावपळ, प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला
“आगपेटी पेटण्याआधीच वकिलांनी पकडले; न्यायालयात काही काळ उडाली खळबळ”
अंबाजोगाई | रोखठोक न्यूज प्रतिनिधी
अंबाजोगाई येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात गुरुवारी (दि. १ ऑक्टोबर) दुपारी न्यायालयीन कामकाज सुरू असतानाच धक्कादायक प्रकार घडला. एका फौजदारी खटल्यातील आरोपीने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेतल्यानंतर आगपेटी काढून आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित वकिलांनी वेळीच धाव घेत आरोपीला पकडल्याने मोठा अनर्थ टळला.
न्यायालयातच दिली आत्महत्येची धमकी
गुरुवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास न्यायालय क्रमांक एकमध्ये नियमित फौजदारी खटल्याचे कामकाज सुरू होते. यावेळी खटल्यातील आरोपी विलास कुंडलिक घुगे (रा. लाडेवडगाव, ता. केज) हा त्याचा मुलगा आणि वकिलांसह न्यायालयात उपस्थित होता.
याच प्रकरणातील फिर्यादी आपल्या पत्नीबाबत गावात आक्षेपार्ह चर्चा करत असल्याचा आरोप आरोपीने केला. फिर्यादीला तात्काळ न्यायालयात बोलावून घ्या, अन्यथा पेट्रोल टाकून आत्महत्या करतो, अशी धमकी देत त्याने खिशातून पेट्रोलची बाटली काढली.
यानंतर त्याने स्वतःच्या अंगावर तब्बल अर्धा लिटर पेट्रोल ओतून घेतले. त्यानंतर त्याने खिशातून आगपेटी बाहेर काढल्याने न्यायालयात एकच खळबळ उडाली.
आगपेटी पेटण्याआधीच वकिलांची धाव!
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच विधीज्ञ आय. ए. गवळी यांनी क्षणाचाही विलंब न करता आरोपीला पकडले. त्याचवेळी सरकारी वकील एस. एम. वाघमारे यांनी आरोपीच्या हातातील आगपेटी हिसकावून घेतली. इतर वकिलांनीही तत्काळ हस्तक्षेप करून आरोपीला शांत करण्याचा प्रयत्न केला.
या प्रसंगावधानामुळे पेट्रोलने भिजलेल्या अवस्थेत आग लागण्याचा संभाव्य धोका टळला आणि मोठा अनर्थ होता होता वाचला.
पोलिसांची न्यायालयात धाव; आरोपी ताब्यात
घटनेची माहिती सरकारी वकील एस. एम. वाघमारे यांनी तात्काळ अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी न्यायालयात धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले.
या प्रकरणी न्यायालयाचे सहाय्यक दिवाणी कनिष्ठ स्तर बालाजी चाटे यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात आरोपी विलास कुंडलिक घुगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायदानाचे कामकाज सुरू असलेल्या न्यायालयातच पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न झाल्याने न्यायालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, वकील आणि उपस्थितांच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
