लोकशाहीच्या रक्षणासाठी रजनीताई पाटील मैदानात; मतचोरीविरोधात काँग्रेसचा दिल्लीच्या मैदानावर एल्गार!
मतदारांच्या हक्कांसाठी आवाज बुलंद; निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर सवाल, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी
रोखठोक न्यूज वार्ताहर
लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि मतदारांच्या घटनात्मक अधिकारांच्या संरक्षणासाठी काँग्रेसने दिल्लीच्या मैदानावर जोरदार एल्गार पुकारला आहे. मतचोरीचे आरोप, मतदार याद्यांमधील कथित अनियमितता आणि एसआयआर (SIR) प्रक्रियेतील आक्षेप या मुद्द्यांवरून आयोजित करण्यात आलेल्या सभेत हिमाचल प्रदेश काँग्रेसच्या प्रभारी तथा माजी खासदार रजनीताई अशोकराव पाटील यांनी आक्रमक भूमिका मांडत मतदारांच्या हक्कांसाठी आवाज बुलंद केला.
निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, मतदार याद्यांची अचूकता आणि प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार अबाधित राहावा, या प्रमुख मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रजनीताई पाटील यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत लोकशाही व्यवस्थेत मतदारांचा विश्वास कायम राखण्याची गरज अधोरेखित केली.
या सभेला हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, काँग्रेसचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेसच्या या शक्तिप्रदर्शनातून मतदारांच्या अधिकारांचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर पुन्हा ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मतदार याद्यांमधील कथित त्रुटी, पात्र मतदारांची नावे वगळली जाण्याचे आक्षेप, मतदानाच्या अधिकारांचे संरक्षण आणि एसआयआर प्रक्रियेतील पारदर्शकता या विषयांवर सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
मतदारांचा अधिकार हा लोकशाहीचा आत्मा!
लोकशाहीमध्ये प्रत्येक पात्र नागरिकाला निर्भयपणे मतदान करता आले पाहिजे. मतदार याद्या अचूक असणे आणि निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असणे ही निवडणूक व्यवस्थेची मूलभूत जबाबदारी आहे. मतदारांचा मतदानाचा अधिकार अबाधित राहिला पाहिजे आणि घटनात्मक संस्थांवरील जनतेचा विश्वास टिकला पाहिजे, अशी ठाम भूमिका काँग्रेसच्या नेत्यांनी यावेळी मांडली.
मतचोरीच्या आरोपांवरून देशातील राजकीय वातावरण तापले असताना दिल्लीतील या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या आंदोलनात रजनीताई अशोकराव पाटील यांचा सहभाग आणि त्यांनी मांडलेली भूमिका लक्षवेधी ठरली.
लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहणार, असा निर्धार या सभेतून व्यक्त करण्यात आला.
