• Thu. Oct 22nd, 2026

प्रेमसंबंधाच्या संशयातून प्राध्यापकाचे अपहरण; बर्दापूरच्या खडी केंद्रावर बेदम मारहाणीत खून!लातूरहून अपहरण करून अंबाजोगाई तालुक्यात आणले; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल, रुग्णालयातील बनाव पोलिसांनी उधळला

Bybaba maske

Oct 6, 2026

प्रेमसंबंधाच्या संशयातून प्राध्यापकाचे अपहरण; बर्दापूरच्या खडी केंद्रावर बेदम मारहाणीत खून!

लातूरहून अपहरण करून अंबाजोगाई तालुक्यात आणले; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल, रुग्णालयातील बनाव पोलिसांनी उधळला

रोखठोक न्यूज वार्ताहर

अंबाजोगाई / लातूर : एका महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून लातूर शहरातील ३२ वर्षीय प्राध्यापकाचे अपहरण करून अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथील खडी केंद्रावर नेण्यात आले. तेथे लोखंडी रॉड, बेल्ट आणि काठ्यांनी बेदम मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माधव ऊर्फ नितीन धनाजी संगमे (वय ३२) असे मृत प्राध्यापकाचे नाव आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साखरपुड्याच्या तयारीसाठी गावी आले अन्…

माधव संगमे हे कोल्हापूर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. आपल्या लहान भावाच्या साखरपुड्याच्या तयारीसाठी ते गावी आले होते. रविवारी दुपारी त्यांना फोन करून लातूर शहरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात बोलावून घेण्यात आले. तेथून पृथ्वीराज देशमुख, धवल देशमुख, प्रथमेश रेड्डी आणि आदित्य भालके (सर्व रा. लातूर) यांनी चारचाकी वाहनातून त्यांचे अपहरण केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

बर्दापूरच्या खडी केंद्रावर अमानुष मारहाण

एका महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून आरोपींनी माधव संगमे यांना बर्दापूर येथील खडी केंद्रावर नेले. तेथे त्यांना लोखंडी रॉड, बेल्ट आणि काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत ते गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले.

रुग्णालयात नेले अन् बनाव उघडकीस

माधव यांची प्रकृती गंभीर झाल्यानंतर आरोपी आदित्य भालके याने त्यांना लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

यानंतर माधव हे बर्दापूरजवळ जखमी अवस्थेत सापडल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले. मात्र रुग्णालयात उपस्थित पोलिसांना संशय आल्याने त्यांनी चौकशी सुरू केली. पोलिसांच्या चौकशीत अपहरणापासून मारहाणीपर्यंतचा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा

मयताचा लहान भाऊ नरेंद्र संगमे यांच्या फिर्यादीवरून शिवाजी नगर पोलिस ठाण्यात पृथ्वीराज देशमुख, धवल देशमुख, प्रथमेश रेड्डी आणि आदित्य भालके यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!