लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण; केजच्या ढाब्यावर पोलिसांचा छापा!
पुण्यातून अपहरण करून आणलेल्या १६ वर्षीय मुलीची सुरक्षित सुटका; आरोपी जेरबंद, न्यायालयीन कोठडी
रोखठोक न्यूज वार्ताहर
केज : कर्नाटक राज्यातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी पुण्यातील मावशीकडे पाहुणी म्हणून आली असताना, मावशीच्या ओळखीचा गैरफायदा घेत तिचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातून अपहरण करून मुलीला केज तालुक्यात आणण्यात आले होते. मात्र, तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढत सारूळ फाट्यावरील ढाब्यावर धाड टाकून मुलीची सुखरूप सुटका केली आणि आरोपीला जेरबंद केले.
९ सप्टेंबर रोजी पुण्यातील वडगाव बुद्रुक येथून मुलीचे अपहरण झाले होते. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी केज तालुक्यात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने सारूळ फाट्यावरील एका ढाब्यावर छापा टाकला. या ढाब्यावर वेटर म्हणून काम करणारा संभाजी हरिश्चंद्र बाजूळगे (रा. होळी, ता. औसा, जि. लातूर) याने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून आणल्याचे तपासात समोर आले.
पोलिसांनी तातडीने कारवाई करत अल्पवयीन मुलीची सुरक्षित सुटका केली आणि आरोपी संभाजी बाजूळगे याला ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीसह मुलीला पुणे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
पुण्यातील पॉक्सो न्यायालयाने आरोपीला १६ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोउपनि कराडकर, डापकर, ममंदे व पोलिस पथकाने केली. तपास अधिकारी पीएसआय माधुरी काजळे यांच्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी पुण्यातील मावशीकडे पाहुणी म्हणून आली होती. आरोपी संभाजी बाजूळगे याने मावशीच्या ओळखीचा गैरफायदा घेत तिचे अपहरण केले होते.
