• Thu. Oct 22nd, 2026

अंबाजोगाई घरफोडीतील तिसऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या!१८ तोळे सोने आणि ७४३ ग्रॅम चांदी जप्त; आतापर्यंत ४५ तोळे सोने, १६०१ ग्रॅम चांदी पोलिसांच्या हाती

Bybaba maske

Oct 3, 2026

अंबाजोगाई घरफोडीतील तिसऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या!

१८ तोळे सोने आणि ७४३ ग्रॅम चांदी जप्त; आतापर्यंत ४५ तोळे सोने, १६०१ ग्रॅम चांदी पोलिसांच्या हाती

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील बंद घराचे कुलूप तोडून तब्बल 53 तोळे सोन्याचे दागिने, पावणेदोन किलो चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करणाऱ्या टोळीतील पाहिजे आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीकडून 18 तोळे (187.430 ग्रॅम) सोन्याचे दागिने आणि 743 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

दि. 20 सप्टेंबर 2026 रोजी अंबाजोगाई शहरातील एका कुटुंबातील सदस्य कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. घराला कुलूप असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. घरातील 53 तोळे सोन्याचे दागिने, पावणेदोन किलो चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 391/2026 अन्वये कलम 331(3), 331(4), 3(5) बीएनएसनुसार घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे व त्यांच्या पथकाने समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान दि. 25 सप्टेंबर रोजी अमर काकासाहेब थोरात (वय 23, रा. क्रांतीनगर, अंबाजोगाई) आणि जगजीतसिंग अचलसिंग दुधानी (वय 32, रा. शिवाजी चौक, परळी) यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून 27 तोळे (270 ग्रॅम) सोने आणि 858 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करण्यात आले होते.

मात्र, या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी मंगलसिंग हिरासिंग बावरी (वय 22, रा. शिवाजी चौक, परळी) हा पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वीच पसार झाला होता. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेने त्याचा शोध घेण्यासाठी तांत्रिक विश्लेषणासह गोपनीय बातमीदारांचे जाळे सक्रिय केले. आरोपीचा बाहेर जिल्ह्यात तसेच बाहेरील राज्यात पाठलाग करण्यात आला.

दरम्यान, मंगलसिंग बावरी हा बाहेर राज्यातून परळी येथे आपल्या घरी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार दि. 3 ऑक्टोबर रोजी पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे व त्यांच्या पथकाने परळी रेल्वे पुलाजवळ गुप्त सापळा रचला. आरोपी मंगलसिंग बावरी याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 18 तोळे (187.430 ग्रॅम) सोन्याचे दागिने आणि 743 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने (विट) जप्त करण्यात आले.

या कारवाईमुळे अंबाजोगाई घरफोडी प्रकरणातील चोरीच्या मुद्देमालापैकी आतापर्यंत एकूण 45 तोळे सोन्याचे दागिने आणि 1601 ग्रॅम चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.

ही कारवाई बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक बीड समीर शेख आणि सहायक पोलीस अधीक्षक अंबाजोगाई ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, PSI सुशांत सुतळे तसेच पोलीस हवालदार रामचंद्र केकान, मारोती कांबळे, विष्णु सानप, गोविंद भताने, गोविंद राख, अर्जुन यादव, विकास राठोड, पोलीस अंमलदार सचिन आंधळे, अश्वीनकुमार सुरवसे आणि चालक अतुल हराळे यांच्या पथकाने केली.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!