केजमध्ये तलाठी लाच घेताना ACBच्या जाळ्यात!
जमीन महसूल व सातबारा नोंदीच्या कामासाठी लाचेची मागणी; उमरी सज्जातील तलाठी फलके रंगेहात पकडले
रोखठोक न्यूज वार्ताहर
केज : जमीन महसूल आणि सातबारा नोंदीशी संबंधित शासकीय कामासाठी तक्रारदाराकडे लाचेची मागणी करून ती स्वीकारताना केज तालुक्यातील उमरी सज्जाचे तलाठी फलके यांना बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या कारवाईने केज तालुक्यातील महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तक्रारदाराच्या जमिनीशी संबंधित शासकीय कामासाठी तलाठी फलके यांनी लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. शासकीय काम करून घेण्यासाठी लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने थेट बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची एसीबीच्या पथकाने पडताळणी केल्यानंतर कारवाईचा सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने तलाठी फलके यांना रंगेहात पकडले.
या कारवाईनंतर तलाठी फलके यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान, शासकीय कामासाठी कोणी अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी घाबरून न जाता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन एसीबी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
महसूल विभागातील या कारवाईमुळे आता तलाठी कार्यालयांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, एसीबीच्या पुढील तपासात आणखी काय समोर येते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
