*देवदर्शनाला जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील मिनी गंठन लांबविले*
*केज बस स्टॅंड मध्ये बसमध्ये चढत असताना झाली चोरी*
*सीसीटीव्ही फुटेज आधारे लवकरच चोरांना जेरबंद करू*
— सपोनि शंकर वाघमोडे
गौतम बचुटे/केज :- केज येथील बसस्थानकातून देवदर्शनाला जाण्यासाठी बसमध्ये चढत असलेल्या महिलेच्या गळ्यातील ६५ हजार रुपये किंमतीचे १६ ग्रॅमचे सोन्याचे मिनीगंठण अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.या बाबतची माहिती अशी की, गुरुवार दि. २९ सप्टेंबर रोजी केज शहरातील क्रांती नगर भागात राहत असलेल्या सुरेखा श्रीराम दांगट आणि त्यांचे नातेवाईक सुनिता मधुकर मोरे, द्वारका बाबुराव मोरे या सकाळी ११:०० वा च्या सुमारास धारूर तालुक्यातील अंबाचौंडी देवीचे दर्शन घेण्यासाठी निघाल्या होत्या. अंबा चौंडी देवीला जाण्यासाठी त्या केज शहरातील बसस्थानकातून धारूरकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना; गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने सुरेखा दांगट यांच्या गळ्यातील ६५ हजार रुपये किंमतीचे १६ ग्रॅमचे सोन्याचे मिनीगंठण तोडून घेत पोबारा केला. गाडीत बसल्या नंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात येताच यांनी गर्दीत शेजारी पुढे उभे असलेले प्रवाशी यांचा शोध घेतला मात्र ते आढळून आले नाहीत मग त्या तिघी गाडीतून खाली उतरल्याआणि त्यांनी बस स्टँडवर येऊन संशयितांची शोध घेतला मात्र ते मिळून आले नाहीत.
दि. ३० सप्टेंबर रोजी सुरेखा दांगट यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध केज पोलिसात गु. र. नं. ४४२/२०२२ भा. दं. वि. ३७९ नुसार गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहाय्य क पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार श्रीकांत चौधरी हे पुढील तपास करत आहेत.
——————
*” बस स्थानक परिसरातील चोऱ्या रोखण्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करीत असून सीसीटीव्ही फुटेज प्राप्त होताच आम्ही संशयित चोरट्यांना घेतले जाईल. तसेच प्रवाशांनी प्रवास करताना दागदागिने आणि ऐवज यावर लक्ष ठेवावे.”*