• Sat. Aug 8th, 2026

जल जीवन मधील दोषी अधिकारी,कर्मचाऱ्यांवर कारवाई करा – पालकमंत्री सावे यांचे आदेश !!

Bybaba maske

Oct 6, 2022

जल जीवन मधील दोषी अधिकारी,कर्मचाऱ्यांवर कारवाई करा – पालकमंत्री सावे यांचे आदेश !!

बीड प्रतिनिधी – बीड जिल्हा परिषदेच्या जल जीवन मिशनच्या योजनेत झालेल्या महाघोटाळ्याची माहिती आपण घेतली आहे.यामध्ये जे अधिकारी, कर्मचारी दोषी आहेत त्यांच्यावर तातडीने कारवाई करा असे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले असल्याची माहिती बीडचे नवनियुक्त पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली.
बीड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या जल जीवन मिशन या योजनेत अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना कोट्यवधी रुपयांची कामे दिल्याचे न्यूज अँड व्युज ने उघडकीस आणले.
ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील शिवाजी चव्हाण, एम आर लाड, आनेराव या कर्मचाराऱ्यांनी तीनशे कोटींपेक्षा अधिक कामे कुटुंबातील सदस्यांना अन मर्जीतल्या गुत्तेदारांना दिली.यामध्ये सीईओ अजित पवार,प्रकल्प संचालक प्रदीप काकडे,नामदेव उबाळे यांनी कर्मचारी अन गुत्तेदारांना पाठीशी घालत या महाघोटाळ्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले.
दरम्यान बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले सहकार मंत्री तथा बीडचे नवनियुक्त पालकमंत्री अतुल सावे यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा सावे यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती अन तक्रारी आपल्याकडे आल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील योजनेत सीईओ पासून ते तृतीय श्रेणी कर्मचारी यांच्यापर्यंत अनेकजण दोषी असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
आपण या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेत जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत जिल्हाधिकारी यांना दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.असे सांगितले. जल जीवन मिशनच्या कामात झालेल्या महाघोटाळ्याची दखल आता पालकमंत्री अतुल सावे यांनी घेतल्याने घोटाळेबाज अधिकारी, कर्मचारी आणि गुत्तेदार यांचे धाबे दणाणले आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!