सेक्सटाॅर्शन चे प्रमाण खुप वाढले, आपल्या तालुक्यातील तरूण सुद्धा जाळ्यात.
कसे करतात ‘सेक्सटॉर्शन’ ?
साधाऱणपणे सर्वच वयोगटातील नागरिक फेसबुकसारख्या समाजमाध्यमांचा वापर करत असतात. त्यामुळे फेसबुकद्वारे सावज हेरण्याचे प्रकार सुरू झाले होते. पायल शर्मा, स्वीटी शर्मासारख्या मुलींच्या नावाने फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवली जायची. सुंदर चेहऱ्याच्या मुलीचे छायाचित्र ठेवले जायचे. ही फेसबुक रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर ती मुलगी मेसेंजरवर येऊन चॅट करते आणि मग अश्लिल संभाषण करण्यास उद्युक्त करते. काही त्याला बळी पडायचे. मग त्या अश्लिल संभाषणाची चित्रफीत रेकॉर्ड करून खंडणी मागितली जायची. बदनामीला घाबरून संबंधित व्यक्ती बळी पडायची आणि पैसे द्यायची. आता त्यांनी आता थेट व्हॉटस अॅूपवर संपर्क करण्यास सुरुवात केली आहे.
व्हॉट्सअप क्रमांकाची गोपनीयता आता संपली
आपल्या व्हॉट्सअप क्रमांकाची गोपनीयता केव्हाच संपली आहे हे आपल्या लक्षात येत नाही. विविध ॲप डाऊनलोड करण्यापासून अगदी मॉलमधील दुकानात खरेदी करताना आपण आपला व्हॉटसअप क्रमांक देत असतो. बँकांपासून विविध ठिकाणी आपला आधार कार्ड क्रमांक देत असतो. आपली ही माहिती अशाच ठिकाणांहून सायबर भामटे मिळवू लागले आहेत. त्याचा गैरवापर करून फसवणूक केली जाते. आपल्यालाच का कॉल येतात असा प्रश्न पडेल. मात्र सायबर भामटय़ांना तुम्ही कोण आहात हे माहिती नसते. ते फक्त एक खडा मारून बघत असतात. ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकाराला फिशिंग असे म्हणतात. तलावातील मासे पकडण्यासाठी गळाला खाद्य लावून ते पाण्यात सोडले जाते. तलावात हजारो मासे असतात. पण एखादा मासा त्या गळाला लागतो. सायबर भामटय़ांची पद्धतदेखील अशीच आहे. हजारो लोकांना कॉल करायचे त्यातील एक गळाला लागतो. म्हणून त्याला फिशिंग म्हटले जाते.
काय काळजी घ्याल?
एखाद्या व्यक्तीने फेक प्रोफाईलवरील मुलीच्या आमिषाला बळी पडून तिच्याशी खरेच अश्लिल संभाषण केले असेल तर तो घाबरतो. कारण त्याची चित्रफित त्या भामटय़ांच्या हातात असते आणि ते ऑनलाइन टाकण्याची धमकी देत असल्याने ती व्यक्ती पैसे देते. मात्र खरीखुरी अश्लिल चित्रफीत ते कुठेच अपलोड करत नाहीत. कारण तसे केले तर ते पकडले जाण्याची शक्यता असते. दुसरे म्हणजे कुणा व्यक्तीची बदनामी करणे हा त्यांचा हेतू नसतो. त्यांना फक्त पैसे उकळायचे असतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने पैसे देण्यास नकार दिला तर ते सरळ दुसऱ्या सावजाकडे वळतात. त्यामुळे तुमची खरी अश्लिल चित्रफीत असो वा नसो या सायबर भामटय़ांकडे दुर्लक्ष करणे हाच सोप्पा उपाय. आर्थिक व्यवहार करूच नये आणि फारच त्रास होत असेल तर थेट पोलीस ठाणे गाठावे. कारण दररोज अशा अनेक तक्रारी येत असल्याने आर्थिक फसवणूक झाल्याशिवाय पोलीसही गुन्हा दाखल करत नाहीत. याशिवाय प्राथमिक सायबर सुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. पासवर्ड नियमित बदलणे, आपले समाजमाध्यमांवरील प्रोफाईल लॉक ठेवणे आवश्यक आहे.
कंप्लेंट कोठे कराल:सायबर पोलिस ठाणे – 020-29710097:ई-मेल – crimecyber.pune@nic.in