• Sat. May 30th, 2026

जनगणनेचे काम करणाऱ्या शिक्षकासह ९ जणांना पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा; केज तालुक्यात खळबळ

Bybaba maske

May 26, 2026

जनगणनेचे काम करणाऱ्या शिक्षकासह ९ जणांना पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा; केज तालुक्यात खळबळ

रोखठोक न्यूज | केज प्रतिनिधी

केज तालुक्यातील लव्हुरी येथे जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य बजावणाऱ्या एका प्रगणक शिक्षकासह गावातील अन्य आठ नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेत गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शासकीय कामासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सर्व जखमींवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सध्या २०२७ च्या जनगणनेचे काम शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांमार्फत युद्धपातळीवर सुरू आहे. लव्हुरी येथील श्री. बडेबाबा विद्यामंदिर शाळेचे सहशिक्षक तथा प्रगणक मंगेश गोविंदराव सोनके हे सोमवारी सकाळी गावात जनगणनेची माहिती संकलित करत असताना अचानक एका पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.

शिक्षकावर हल्ला केल्यानंतर संबंधित कुत्रा अधिक आक्रमक झाला आणि त्याने गावातील शिवाजी चाळक, अयोध्या चाळक, अमोल चाळक, गोवर्धन चाळक, संतोष चाळक, राजेभाऊ चाळक, मुरलीधर चाळक आणि सचिन चाळक या आठ नागरिकांनाही वेगवेगळ्या ठिकाणी गाठून चावा घेतला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेनंतर जखमींना तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. राष्ट्रीय महत्त्वाच्या कामासाठी घराघरांत जाऊन माहिती संकलित करणाऱ्या प्रगणकांना अशा धोकादायक परिस्थितीत काम करावे लागत असल्याने शिक्षक संघटना आणि कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान, तालुका प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन दुर्गम व संवेदनशील भागात जनगणनेचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच स्थानिक पातळीवर मदतीसाठी किमान एका व्यक्तीची नियुक्ती करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!