मुलीचा फोटो, काळी बाहुली आणि खिळा झाडाला; बीड शहरात खळबळ, ‘जादूटोणा’च्या चर्चांना उधाण!
रोखठोक न्यूज वार्ताहर | बीड
बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात एका झाडाला मुलीचा फोटो, काळ्या रंगाची बाहुली आणि खिळा लावलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकाराचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ‘जादूटोणा’ आणि अघोरी प्रकाराच्या चर्चांनी जोर धरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माने कॉम्प्लेक्स परिसरातील एका झाडावर मुलीचा फोटो खिळ्याने ठोकण्यात आला होता. त्याच ठिकाणी काळ्या रंगाची बाहुली टांगण्यात आल्याने हा प्रकार पाहणाऱ्या नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीती निर्माण झाली. परिसरात मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगल्या असून अनेकांनी याबाबत वेगवेगळे तर्क लावण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात अशा घटनांमुळे अंधश्रद्धेला खतपाणी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कोणत्याही अप्रमाणित दाव्यांवर विश्वास ठेवण्याऐवजी घटनेची सत्यता पडताळून पाहणे आवश्यक असल्याचे सुजाण नागरिकांचे मत आहे.
हा प्रकार नेमका कोणी आणि कोणत्या उद्देशाने केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, एका फोटो, बाहुली आणि खिळ्याने संपूर्ण शहरात चर्चेचे वादळ उठवले असून बीडमध्ये या रहस्यमय घटनेची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे.
