• Tue. May 26th, 2026

हिशोबाच्या वादातून तरुणाचा खून; दारू दुकान मालकावर ॲट्रॉसिटीसह गुन्हा

Bybaba maske

May 25, 2026

हिशोबाच्या वादातून तरुणाचा खून; दारू दुकान मालकावर ॲट्रॉसिटीसह गुन्हा

रोखठोक न्यूज | बीड

बीड शहर हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली असून दारू दुकानात काम करणाऱ्या एका ३५ वर्षीय तरुणाची पैशांच्या आणि हिशोबाच्या वादातून दुकान मालकानेच बेदम मारहाण करून हत्या केल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनासह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोरे वस्ती परिसरातील उमेश नवनाथ दळवी हे सहारा हॉटेलसमोरील लाला शेख यांच्या दारू दुकानात मजुरीचे काम करत होते. दुकानाच्या हिशोबात गडबड झाल्याचा संशय घेत मालक शेख इरफान शेख समद उर्फ लाला हा उमेशकडे वारंवार पैशांची मागणी करत होता. तसेच त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे.

२३ मे रोजी कामावर जाताना उमेश यांनी पत्नीला मालकाकडून सुरू असलेल्या धमक्यांची माहिती दिली होती. त्यानंतर २४ मे रोजी पहाटे बालेपीर नगर रोडवरील महेबुब नर्सरीजवळील दुकानात आरोपीने उमेशला गंभीर दुखापत होईपर्यंत बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले; मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी मयत उमेश दळवी यांच्या पत्नी संगीता दळवी यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपी शेख इरफान शेख समद उर्फ लाला याच्याविरुद्ध खून व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अप्पर पोलीस अधीक्षक वेंकटराम करत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!