युसुफवडगाव (ता. केज) येथे गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास वादळी वारे आणि मेघगर्जनेसह झालेल्या अवकाळी पावसात दोन मित्रांवर अचानक वीज कोसळली. या दुर्घटनेत १५ वर्षाचा युवक जागीच ठार झाला. तर त्याच्या मित्र गंभीर भाजला असून त्याच्यावर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
केज शहरातील सुशांत विक्रम वाकळे आणि संकेत चंदर गित्ते हे दोघे मित्र दुचाकीवरून गुरुवारी दुपारी युसुफवडगाव येथे कामानिमित्त आले होते. काम आटपून परत सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास निघाले असता वादळी वारे आणि मेघगर्जनेसह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. पाऊस हलका असल्याने ते दुचाकीवरून जात असताना केज रस्त्यावरील गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ आले होते. तेवढ्यात अचानक वीज त्यांच्या अंगावर कोसळली. यात संकेत चंदर गित्ते (वय १५) याचा जागीच मृत्यू झाला. तर सुशांत वाकळे हा गंभीर भाजला असून त्याला उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, केज शहर आणि तालुक्यात वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह रात्री उशिरापर्यंत अवकाळी पाऊस सुरू होता. वाऱ्याने विद्युत पुरवठा खंडित होता.