जल जीवन मिशनच्या कामात अटकाव; कानडी माळीचे सरपंच – सदस्यावर गुन्हा
रोखठोक न्युज वार्ताहर
कानडी माळी (ता. केज) येथे जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मंजूर झालेल्या नळ पाइपलाइनच्या कामात अटकाव केल्याप्रकरणी सरपंचासह एका सदस्याविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा झाला आहे.
जिल्हा परिषद उपविभाग केजचे उपअभियंता अनिल तांदळे व प्रकल्प अभियंता एल. डी. हुले यांनी ठेकेदार सुजित श्यामसुंदर पडुळे यांना नळ पाइपलाइनचे काम करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यावरून त्यांनी रस्त्याच्या कडेने १० किमी पाइपलाइनचे काम केलेले आहे. १२ मे रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास सुजित पडुळे यांनी काम सुरू केले असता सरपंच अशोक राऊत व ग्रा. पं. सदस्य गणेश राऊत हे कामावर आले. त्यांनी आमच्या गावची योजना आहे, ती करायची की नाही ते आम्ही ठरवणार असे म्हणून काम अडवले. त्यामुळे पडुळे यांनी माहिती उपअभियंता अनिल तांदळे यांना देत पोलिस ठाण्यात व जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अर्ज दिला होता. दरम्यान, उपअभियंता अनिल तांदळे हे गावात खातरजमा करण्यासाठी गेले असता त्यांनाही सरपंच व सदस्याने हे काम आमच्या गावचे असून ते करायचे की नाही हे
आम्ही ठरवणार असे म्हणत शासकीय कामात अटकाव आणला, अशी तक्रार उपअभियंता अनिल तांदळे यांनी दिल्यावरून सरपंच अशोक राऊत व ग्रा. पं. सदस्य गणेश राऊत या दोघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, सरपंच अशोक राऊत व ग्रा. पं. सदस्य गणेश राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश सीईओ अजित पवार यांनी दिले होते. गटविकास अधिकाऱ्यांना ही सरपंच व सदस्यांवर नियम ३९ अ अन्वये कार्यवाही प्रस्तावित करावी, अशा सूचना दिल्याने सरपंच व सदस्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे.
