• Sun. Apr 19th, 2026

शहीद जवान उमेश मिसाळ यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार देश भक्ती च्या घोषणा देत निघाली अंत्ययात्रा आई आई पत्नीचा काळीज पिळवटून टाकणारा टाहो

Bybaba maske

Jun 28, 2023

शहीद जवान उमेश मिसाळ यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

देश भक्ती च्या घोषणा देत निघाली अंत्ययात्रा

आई आई पत्नीचा काळीज पिळवटून टाकणारा टाहो

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील कोल्हेवाडी गावचे सुपुत्र उमेश नरसु मिसाळ हे भारतीय सैन्य दलात कार्यरत असताना सुरतगड येथे सेवा बजावत असताना विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता. त्यांच्यावर शासकीय इतमामात जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

बीड जिल्ह्यातील कोल्हेवाडी ता केज गावचे सुपुत्र उमेश नरसु मिसाळ वय (२३ वर्ष) हे भारतीय सैन्य दलात २५ मराठा लाईट इन्फन्ट्री बटालियनमध्ये सुरतगढ येथे सेवा बजावत होते. दि. २६ जून रोजी सकाळी त्यांचे विजेचा शॉक लागून अपघाती निधन झाले होते.

सुभेदार सुधाकर कुटाळ व त्यांचे सहकारी शहीद उमेश मिसाळचे पार्थिव घेऊन दि. २७ जून रोजी रात्री १२:३० नंतर दिल्ली येथून विमानाने पुणे येथे पोहोचले. त्या नंतर ते २८ जून रोजी सकाळी ८:३० वा. मूळगावी केज तालुक्यातील कोल्हेवाडी येथे पोहोचले. त्या नंतर फुलांनी सजविलेल्या ट्रकमध्ये त्यांचा तिरंग्यात आच्छादलेल्या शवपेटीतील मृतदेह ठेवून गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी उमेश मिसाळ अमर रहे आणि भारत माता की जय च्या घोषणा देण्यात आल्या. अंत्ययात्रेच्या मार्गावर रांगोळी काढून फुलांचा सडा टाकलेला होता. तसेच रस्त्याच्या दुतर्फा जिल्ह्यातील नागरिकांनी उभे राहून उमेश याचे अंतिम दर्शन घेत त्याच्यावर फुलांची उधळण केली. त्या नंतर त्याचे प्रेत अंतिम दर्शनासाठी काही वेळ त्याच्या पत्र्याच्या शेडवजा घरा समोर ठेवण्यात आले. बीड जिल्ह्याच्या खा. डॉ. प्रितमताई मुंडे, तहसीलदार एम जी खंडागळे, गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, जिल्हा सैनिक बोर्डाचे अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्या प्रा. सुशीलताई मोराळे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रत्नाकर शिंदे, भाजपचे अक्षय मुंदडा, २५ मराठा इन्फन्ट्रीचे सुभेदार सुधाकर कुटाळ, भाजपचे केज तालुकाध्यक्ष भगवान केदार, माजी सैनिक संघटनेचे प्रा. हनुमंत भोसले, मेजर अजिमोद्दीन इनामदार पत्रकार महसूल कर्मचारी पोलीस अधिकारी व कर्मचारी, पंचायत समितीची अधिकारी व कर्मचारी यांनी पुष्पचक्र अर्पण केले.

 त्या नंतर पोलीस दलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. नंतर वडील नरसू मिसाळ यांनी चितेला अग्नी दिला. यावेळी उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला.

उमेश मिसाळ यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील व दोन भाऊ असा परिवार आहे.

————————————————

चौकट :-

प्रेताला अग्नी देण्यापूर्वी प्रेताला अच्छादलेला तिरंगी झेंडा आणि त्याचे गणवेष सुभेदार सुधाकर कुटाळ यांनी पत्नी प्रतीक्षा व आई अंजनाबाई यांच्या स्वाधीन केले.

—————————————————–

दहा महिण्यात प्रतिक्षाला आले वैधव्य :- उमेश आणि प्रतीक्षा यांचा विवाह दहा महिन्या पूर्वी २९ ऑगस्ट २०२२ रोजी झाले होते आणि अवघ्या दहा महिन्यातच प्रतीक्षा हिला वैधव्य आले.

————————————————

पतीच्या भेटीला आतुर झालेल्या प्रतीक्षाला पतीच्या अंत्यविधीला जाण्याचा दुर्दैवी प्रसंग :- दि. २६ जून रोजी उमेश याने त्याच्या पत्नी प्रतिक्षा ही माहेरी असल्याने तिला पहाटे ४:०० वा. फोन करून तो गावी येणार आहे. रजा मंजूर झाली असल्याचे सांगितले होते. त्यामुळे प्रतिक्षा ही आनंदून गेली होती. तिने सासरी कोल्हेवाडी येथे निघण्याची तयारी केली होती. परंतु दुर्दैवाने सकाळी ८:०० वा. तिला पतीच्या अपघाती निधनाची माहिती मिळाली आणि पतीच्या भेटीला आतुर असलेल्या प्रतीक्षा हिला पतीच्या भेटी ऐवजी पतीच्या अंत्यविधीला हजर राहण्याची दुर्दैवी वेळ आली.

———————————————–

फेब्रुवारी २०२१ रोजी सैन्य दलात भरती झाला होता. बेळगाव येथील ९ महिन्याचे ट्रेनिंग संपल्या नंतर त्याची पोस्टिंग २५ मराठा लाईट इन्फन्ट्रीमध्ये सुरतगढ येथे झाली होती.

———————————————–

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!